जेवढे मॅचविनर चेन्नईच्या डगआऊटमध्ये नाहीत तेवढे कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. ही चर्चा चेन्नईच्या सतत होणाऱ्या पराभवामुळे रंगली. जेव्हा सुरेश रैना, मुरली विजय, शेन वॉटसन आणि अंबाती रायडूचा आयपीएलच्या अठराव्या हंगामातील चेपॉकच्या मैदानावरचा फोटो व्हायरला झाला त्यावेळी…. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाला या हंगामात नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला होता. सामना जिंकून देणाऱ्या क्रिकेपटूंचा भरणा या टीममध्ये आहे. मात्र, मैदानावर काही केल्या ते प्रभाव पाडताना दिसले नाहीत. ना फलंदाज चालत आहेत ना गोलंदाज आणि भरीस भर म्हणून की काय क्षेत्ररक्षणही अतिशय सुमार दर्जाचे होत होते. त्याचप्रमाणे चेन्नई सुपरकिंग्जची ओळख असलेल्या धोनीचा क्रमांकही निश्चित नव्हता. कधी तो पाचव्या क्रमांकावर तर कधी थेट नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता. त्यामुळे धोनीची या संघातील नेमकी भूमिका काय असा सवाल उपस्थित होत होता. त्याचवेळी चेन्नईच्या संघव्यवस्थापनानं पुन्हा एकदा या संघाची धुरा आपला हुकमी एका अर्थातच महेंद्रसिंग धोनीकडे सोडवण्याचा निर्णय घेतला.
चेन्नई संघात आणलं नवचैतन्य
कॅप्टन कूल, मॅच फिनीशीर आणि एक उत्तम यष्टीरक्षक…. क्रिकेट जगतात त्याची ही ओळख आहे. एकहाती सामना जिंकून देणे म्हणजे नेमकं काय असतं याचं उत्तम उदाहरण म्हणचे सुपरकिंग्जचा कर्णधार धोनी. इंडियन प्रिमियर लीगमध्ये चेन्नई सुपरकिंग्जला आपल्या कुशल नेतृत्त्व, फलंदाजी आणि चपळ यष्टीरक्षणाच्या जोरावर त्यानं जोरदार पुनरागमन करुन दिलंय. या लीगमध्ये चेन्नईचा संघ गुणतालिकेत तळाला असला तरी धोनीने आपल्या कामगिरीने संघात नवचैतन्य निर्माण केलं आहे, ही बाब नाकारता येत नाही. पाच आयपीएल ट्रॉफी उंचावण्याचा अनुभव गाठिशी असलेला धोनी पुन्हा लयीत आलाय. त्यामळे इतर संघांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. आयपीएलच्या अठराव्या हंगामात चेन्नईने मुंबईला आपल्या घराच्या मैदानावर धूळ चारत दिमाखात सुरुवात केली होती. मात्र, कामगिरीत सातत्य राखण्यात चेन्नईच्या टीमला सपशेल अपयश आलं. आता ही टीम विनिंग ट्रॅकवर परतीलय. या संघाची कामगिरी उंचावण्यात मोलाची भूमिका बजावलीय ती महेंद्रसिंग धोनीने.
माही इज बॅक
2024 च्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या संघव्यवस्थापनने महेंद्रसिंग धोनीकडून ऋतुराज गायकवाडकडे संघाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये चेन्नईला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्यानंतरही धोनीकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. या बदलाननंतर या संघाला 2024 साली चमकदार कामगिरी करता आली नाही. 2025 मध्येही विजयी सलामी दिल्यानंतर चेन्नईच्या संघाला सलग पाच पराभव सहन करावे लागले. त्यातच कर्णधार ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्याने चेन्नईचं टेन्शन वाढलं. कर्णधार म्हणून चेन्नईच्या संघाला त्याची कमी जाणवणारच आहे. पण एक फलंदाज म्हणून ऋतुराजची उणीव संघाला कमालीची भासणार आहे. दरम्यान, ऋतुराजला दुखापत झाल्यामुळे संघाची धुरा कोण सांभाळणार असा यक्ष प्रश्न चेन्नईच्या संघव्यवस्थापनासमोर होता. आणि त्याचं उत्तर त्यांना महेंद्रसिंग धोनीच्या रुपात मिळालं.
कॅप्टन कूल धोनी
ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत धोनीनं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पहिल्यांदा या हंगामात आपल्या संघाचं नेतृत्व केलं. मात्र, त्याला या सामन्यात चेन्नईला विजय साकारुन देता आला नाही. त्याच्या संघानं कशीबशी शंभरी गाठली होती. त्यामुळे नेतृत्वबदलानंतरही चेन्नईचे पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था झालेली दिसली. या पराभावमुळे धोनीला चौफेर टीका सहन करावी लागली. 43 वर्षीय धोनीच्या गळ्यात पुन्हा कर्णधाकपदाची माळ का घालण्यात आली आहे? असा सवाल उपस्थित केला जावू लागला. पण कायमच आपल्या टीकाकारांना शांत आणि संयमाने उत्तर देण्यास लोकप्रिय असलेल्या धोनीने यावेळेसही तेच केले. त्यानं लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आपल्या संघाला मिळवून दिला. हा विजय चेन्नईसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्याने लखनऊ सुपरजायंट्सकडून एकट्याने ही विजयश्री खेचून आणली. त्यामुळे कॅप्टन कूल धोनी इज बॅक अशा चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागल्यात.
हेही वाचा – गोल्डन गर्ल ते बॉस लेडी
विकेटकीपर नंबर वन
या मॅचमध्ये माहीचं नेतृत्त्व कौशल्य तर पाहिला मिळालचं शिवाय त्याला एक उत्तम फिनीशर का म्हटलं जातं याची प्रचितीही आली. तसंच यष्टीमागे चपळाई दाखवत त्यानं आयपीएलमध्ये एका नव्या विक्रमाची नोंदही केली. धोनीने आयपीएलमध्ये जे कुठल्याही यष्टीरक्षकाला शक्य झाले नाही ते शक्य करुन दाखवले. आयपीएलमध्ये यष्टीमागे बळींचे द्विशतक पूर्ण केले. आतापर्यंत धोनीने आयपीएलमध्ये 271 सामने खेळले आहेत. त्यात 155 झेल आणि 46 फलंदाजांना यष्टीचीत त्यानं केलंय. या सामन्यातही त्याच्या यष्टीरक्षणाचं कौतुक करावं तेवढ थोडं आहे. वयाच्या 43 व्या वर्षीही आयपीएलमध्ये त्याचं यष्टीरक्षण एखाद्या युवा यष्टीरक्षकाला लाजवेल एवढं चांगलं झालं आहे. या लीगच्या पहिल्याच सामन्यात सुर्यकुमार यादवला त्यानं यष्टीचीत केलं होतं. केवळ 0.12 सेकंदात धोनीने त्याला यष्टीचीत करत आपले इरादे स्पष्ट केले होते. लखनऊ विरुद्ध त्यानं सर्वत स्तरावर आपली कागमरी उंचावली आहेच. त्याचप्रमाणे आता आपल्या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं आव्हानही त्याला पार कराव लागेल.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचं होणार सुपर कमबॅक ?
आयपीएलच्या अठराव्या हंगमातील कर्णधार धोनीचे सात सामने खेळायचे अजून बाकी आहेत. धोनीचा जर्सी नंबरही सात आहे. आता उर्वरित सात सामन्यांमध्ये हा जर्सी नंबर सातचा क्रिकेटपटू चेन्नईचं नशिब बदलण्यात यशस्वी होईल अशी आहे. दरम्यान, धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जने पाचवेळा आयपीएलच्या चमचमत्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये चेन्नईच्या संघाला आयपीएलचं जेतेपद पटकावता आलंय. तर 2010 आणि 2014 या दोन वर्षी त्यांनी चॅम्पियन्स लीगची ट्रॉफी उंचावली आहे. धोनीच्या नेतृत्वामध्ये चेन्नईने 235 सामन्यात 142 विजय आणि 90 पराभव सहन केलेत. दोन सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तर एक सामना बरोबरीत सुटलाय. कर्णधार म्हणून खेळताना 235 सामन्यात त्यानं 137.95 च्या स्ट्राईक रेटने 4794 धावा केल्यात. नाबाद 84 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. या हंगामात धोनीच्या संघासमोर मोठी अडचण आहे ती मधल्या फळीतील फलंदाजीची. विजय शंकर आणि दीपक हुड्डाला गेल्या सात सामन्यांमध्ये फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. शिवम दुबेलाही लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यात सूर गवसलाय. त्यामुळे ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न माहीला करावा लागेल. त्याप्रमाणे क्षेत्ररक्षणाचा स्तरही त्यांना उंचवण्याची गरज आहे. धोनीच्या नेतृत्त्वाबद्दल कुणालाही शंका नाही. मात्र, त्याला संघसहकाऱ्यांची साथ लाभणं तितकचं गरजेचं आहे.
आता या सगळ्या अडचणींवर मात करत धोनी सहाव्यांदा आपल्या संघाला आयपीएलचं विजेतेपद मिळवून देणार का ते 25मेला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर स्पष्ट होईल.