महाराष्ट्रात ‘झटका’ मांस’ विक्रेत्यांसाठी ‘मल्हार प्रमाणपत्र’ ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी 10 मार्च 2025 रोजी या योजनेची अधिकृत घोषणा केली. या योजनेतून हिंदू समाजातील ग्राहकांना त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार मांस सहज आणि अधिकृतरित्या मिळावे, हा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात आला.
झटका मांस विक्रेत्यांसाठी ही योजना खास असून, केवळ हिंदू दुकानदारच या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. ‘झटका’ ही प्राचीन पद्धत असून, त्यात प्राण्याला एका झटक्यात मारले जाते. त्यामुळे त्यांचा त्वरित मृत्यू होतो आणि वेदना कमी होतात. या पद्धतीचा प्रामुख्याने वापर शीख समाज करतो. याउलट ‘हलाल’ ही इस्लामिक पद्धत असून त्यात प्राण्याचे रक्त हळूहळू काढले जाते.
राज्यातील सर्व झटका चिकन व मटण विक्रेत्यांची नोंदणी करण्यासाठी MalharCertification.com ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. नोंदणीकृत दुकानदारांना ‘मल्हार प्रमाणपत्र’ दिले जाणार असून, हे प्रमाणपत्र त्या दुकानात झटका पद्धतीने मांस मिळते, याची अधिकृत ओळख बनणार आहे.
काय आहे ‘मल्हार मटण’?
‘झटका’ पद्धतीने मिळणाऱ्या मांसाला ‘मल्हार मटण’ असे नाव देण्यात आलं आहे. हे मटण विशेषतः हिंदू ग्राहकांसाठी असून, ते फक्त हिंदू विक्रेत्यांकडूनच मिळणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात सांगितले की, “हिंदूंनी फक्त मल्हार प्रमाणपत्र असलेल्या दुकानांतूनच मांस खरेदी करावे.” अशा प्रकारे, झटका पद्धतीने मिळणारे मांस कोणत्याही धार्मिक विरोधाविना खरेदी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी एअर इंडियाने हिंदू व शीख प्रवाशांसाठी ‘हलाल’ नसलेल्या जेवणाची सोय सुरू केली होती. त्यावरून झटका मांसाला आता अधिक मागणी वाढल्याचे दिसते.
मल्हार प्रमाणपत्र कोणाला दिलं जातं?
हे प्रमाणपत्र केवळ झटका पद्धतीने मांस विकणाऱ्या आणि हिंदू मालकांच्या दुकानांनाच दिले जाते. यासाठी इच्छुक दुकानदारांनी MalharCertification.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागते. नोंदणी करताना काही अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ, दुकानात विकले जाणारे मांस ताजे आणि स्वच्छ असावे. ते बोकड किंवा मेंढीचेच असावे. त्यात इतर प्राण्यांचे मांस मिसळलेले नसावे. शिवाय, मांस प्रक्रिया करताना हिंदू धार्मिक पद्धतींचे काटेकोर पालन झाले पाहिजे. हे मांस फक्त हिंदू खाटीक समाजातील विक्रेत्यांकडूनच खरेदी करणे अपेक्षित आहे. जे विक्रेते या सर्व निकषांचे पालन करतात, त्यांनाच मल्हार प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
मल्हार प्रमाणपत्रासाठी कोण अर्ज करू शकतो?
मल्हार सर्टिफिकेशन हे विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्या झटका मांस विक्रेत्यांसाठी खुले आहे. पात्रता आवश्यकता खाली दिल्या आहेत:
पात्र अर्जदार:
• झटका मांस दुकाने – झटका पद्धतीने मटण, चिकन किंवा इतर मांस विकणारे विक्रेते.
• हिंदूंच्या मालकीचे व्यवसाय – केवळ हिंदूंच्या मालकीची आणि चालवली जाणारी दुकानेच प्रमाणपत्र मिळवू शकतात.
• कत्तलखाने आणि मांस पुरवठादार – मांस प्रक्रियेसाठी झटका पद्धतीचे काटेकोरपणे पालन करणारे व्यवसाय.
कोण पात्र नाही?
• हलाल मांस विकणारे किंवा झटक्याशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने वापरणारे विक्रेते.
• हिंदूंच्या मालकीचे नसलेले व्यवसाय.
• नोंदणीकृत नसलेले मांस विक्रेते किंवा स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करणारे.
मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, “या योजनेमुळे हिंदू तरुणांना आर्थिकदृष्ट्या उभं राहण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे.” झटका मांस विक्रेत्यांसाठी अधिकृत प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांच्या व्यवसायात अधिक विश्वासार्हता येईल आणि ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होईल.
या योजनेमुळे राजकीय वाददेखील निर्माण झाला आहे. विरोधकांचा आरोप आहे की, ही योजना समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.