पुढील वर्षी 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेपासून महाकुंभमेळा सुरू होईल आणि 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीला हा कुंभमेळा संपेल. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं हा महाकुंभमेळा होणार आहे. या भव्य धार्मिक सोहळ्यास 400 दशलक्ष भाविक उपस्थिती असतील असा अंदाज अधिकाऱ्यांचा आहे.
महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. 12 वर्षांनी होणाऱ्या या सोहळ्यात गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने पाप नष्ट होऊन मोक्षप्राप्ती होते, असा भाविकांचा विश्वास आहे.
चार महिन्यांसाठी स्वतंत्र प्रशासकीय जिल्हा
महाकुंभ मेळा 2025 हा भव्य धार्मिक महोत्सव उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं साजरा होणार आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचा अंदाज घेत, राज्य सरकारने प्रयागराजमधील महाकुंभ मेळा क्षेत्राला चार महिन्यांसाठी स्वतंत्र प्रशासकीय जिल्हा म्हणून घोषित केलं आहे. महोत्सव जवळ येत असल्याने या तात्पुरत्या जिल्ह्याची प्रशासकीय कामं आणि कुंभमेळ्यासाठी आवश्यक बांधकाम जोमाने सुरू आहे.
विस्तार आणि सुविधा
महाकुंभ क्षेत्र 25 विभागांमध्ये विभागले आहे. हे क्षेत्र 40 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारले आहे. इथे भाविकांसाठी राहण्यासाठी घरांच्या सोयी, रस्ते, वीज, पाणीपुरवठा आणि कम्युनिकेशन टॉवर उभारले जातील. 2013 च्या कुंभ मेळ्याच्या तुलनेत, 2025 मधील कुंभमेळाचा विस्तार 800 हेक्टरने अधिक असणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, भारतभरातून आणि बाहेरून येणाऱ्या सर्व भक्तांना सुलभ आणि आरामदायक सुखसुविधा मिळाव्यात.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच महाकुंभ 2025 च्या तयारीची पाहणी केली. ते म्हणाले की, मागील कुंभ मेळ्यात 60,000 संस्था आणि 80,000 तंबू होते. या वर्षी 1.8 लाख तंबू उभे करण्यात येतील. यामुळे भक्तांसाठी आणि संस्थांसाठी अधिक जागा उपलब्ध होईल.
15 लाखाहून अधिक तात्पुरत्या शौचालयांची स्वछता आणि परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी सुमारे 20 हजार कामगारांवर असणार आहे. उत्तर प्रदेशचे जलशक्ती आणि पूर नियंत्रण मंत्री स्वातंत्र देव सिंग यांनी सांगितले की, 35 स्थायी घाट आणि 9 नवीन घाट भक्तांच्या पवित्र स्नानासाठी तयार करण्यात आले आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या (TTD) भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यासाठी कुंभमेळा प्रशासन अधिकाऱ्यांनी 2.5 एकर जागा दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 13 डिसेंबर रोजी 45 दिवस चालणाऱ्या या मोठ्या धार्मिक मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या तयारीत एक वेबसाइट, अॅप, 11 भाषांतील एआय चॅटबॉट, QR पास आणि हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी एक सर्वभाषिक डिजिटल केंद्र यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा इथे असणार आहेत
वाहतूक व डिजीटल सोयी
– 550 शटल बसेस आणि 20,000 ई-रिक्षा यात्रेकरूंना सोयीस्कर प्रवासासाठी असणारं आहेत.
– 101 पार्किंग साइट्सची व्यवस्था, तिथे पाच लाख वाहने पार्क केली जाऊ शकतात.
– या पार्किंग क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ 1867.04 हेक्टर इतके आहे.
– प्रत्येक व्यक्तीची संख्या अचूकपणे मोजण्यासाठी attribute method, RFID wristbands आणि मोबाइल अॅप ट्रॅकिंग पद्धती वापरण्यात येतील.
भक्तांची सोय आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली जात आहे. या संपूर्ण सोहळ्यात 24 तास सुरक्षा राखण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 20 अत्याधुनिक ड्रोन तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ड्रोन 24 तास गर्दीवर आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून असणार आहेत. जेणेकरून संपूर्ण परिसर सुरक्षित राहील. स्मार्ट सिटी, महापालिका, पोलिस, आरोग्य आणि वाहतूक विभागही बांधकाम आणि इतर कामकाजावर लक्ष ठेवत आहेत.
प्रयागराज जिल्ह्यात 56 पोलीस ठाणे, 155 पोलीस चौकी, एक सायबर सेल ठाणे, एक महिला ठाणे, तीन जल पोलीस ठाणे आणि तीन मानव तस्करीविरोधी युनिट्स आहेत अशी माहिती द टाइम्स ऑफ इंडिया मध्ये दिली आहे.
भक्तांसाठी आरोग्य सेवा
महाकुंभ मेळा दरम्यान भक्तांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे.
भारतीय सैन्याचे डॉक्टर्स आपली सेवा मोफत देणार आहेत. 100 बेड असलेले एक रुग्णालय, 20 बेड असलेले दोन रुग्णालये आणि 8 बेड असलेली लहान रुग्णालये तयार केली आहेत. त्याचबरोबर, भारतीय सैन्याने दोन 10 बेड असलेली ICU स्थापन केली आहे.
भक्त आणि पर्यटकांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी 291 MBBS डॉक्टर, 90 आयुर्वेद आणि यूनानी तज्ज्ञ आणि 182 नर्सिंग कर्मचारी तैनात केले जातील.
तसेच, पाच लाख भक्तांचे नेत्र परीक्षण आणि त्यांना मोफत चष्मे वाटपही केलं जाणार आहे. 2019 मध्ये पहिल्या नेत्र कुंभमध्ये 1.5 लाख चष्मे वाटले गेले आणि तीन लाख लोकांचे नेत्र परीक्षण झाले. आणि यांची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली आहे.
आध्यात्मिक आणि पर्यावरण कार्यक्रम
आध्यात्मिक आणि पर्यावरण संरक्षणावर आधारित महाकुंभ मेळामध्ये प्लास्टिक मुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आणि स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी 1500 पेक्षा जास्त “गंगा सेवादूत” प्रशिक्षण घेत आहेत. आवश्यकतेनुसार यांची संख्या वाढवली जाऊ शकते.
“हर घर दस्तक” या मोहिमेद्वारे प्रत्येक घर प्लास्टिकमुक्त उपक्रमात सहभागी होईल. भक्तांना याबद्दलची माहिती सुविधा पत्रकांद्वारे दिली जाणार आहे. प्रयागराजमध्ये तीन लाख झाडे लावण्यात आली आहेत.
हेही वाचा : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कुंभमेळ्याचा समावेश
जगातील सर्वात मोठी रांगोळी
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळाच्या शुभ प्रसंगासाठी जगातील सर्वात मोठी ‘रांगोळी’ काढण्यात येणार आहे.
ही रांगोळी 55, 000 चौरस फूट आकाराची असेल.
ही रांगोळी भारताच्या कला आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुशल कलाकार आणि स्वयंसेवकांच्या गटाने तयार केली आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडे लक्ष्य
महाकुंभ मेळा 2025 मध्ये उत्तर प्रदेश राज्य चार जागतिक रेकॉर्ड्स बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.
सर्वात मोठी सिंक्रोनाइझ स्वीपिंग ड्राइव्ह, सर्वात मोठ्या ई-वाहनांचा परेड, 8 तासांत सर्वाधिक हातांच्या ठश्यांचे चित्र काढण्याचा रेकॉर्ड आणि सर्वात मोठी नदी स्वच्छता मोहीम, हे रेकॉर्डस् ठरवण्यात आले आहेत.
महाकुंभ 2025 हा मेळा धार्मिकता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि पर्यटन यांचा संगम असेल.
हेही पहा-Maha Kumbh Mela 2025 : Prayagraj : प्रयागराज महा कुंभमेळा 2025 ची जय्यत तयारी!