अमेरिकन स्पेस एजन्सी नासा (NASA) भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वर पाठवणार असल्याची माहिती इस्रोने एका निवेदनात दिली आहे. ISRO च्या Human Spaceflight Center (HSFC) ने ISS च्या आगामी Axiom-4 मिशनसाठी US-आधारित Axiom Space सोबत स्पेस फ्लाइट करार (SFA) केला आहे. या कराराअंतर्गत दोन भारतीय, एक प्राइम मिशन पायलट आणि एक बॅकअप मिशन पायलट म्हणून सहभागी होणार आहेत.
निवेदनानुसार, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे प्राथमिक मिशन पायलट असतील, तर भारतीय हवाई दलाचे दुसरे अधिकारी, ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे बॅकअप मिशन पायलट म्हणून काम पाहतील.
कोण आहेत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला?
कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 रोजी लखनौ, उत्तर प्रदेश येथे झाला. 1999 मध्ये झालेल्या कारगील युद्धातील शौर्य कथा ऐकून शुभांशु शुक्ला यांना सैन्यात सामील होण्याची प्रेरणा मिळाली. त्याचवेळी त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. आणि याच प्रेरणेने त्यांचा अंतराळवीर होण्याचा मार्गही सुरू झाला.
शुभांशु शुक्ला यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये शिक्षण घेतल्यानंतर 17 जून 2006 रोजी भारतीय हवाई दलात प्रवेश केला. ते त्यांच्या कुटुंबातील सशस्त्र दलात सामील होणारे पहिले सदस्य आहेत.
शुभांशु शुक्ला यांनी टॅक्टिक्स अँड कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (TACDE) स्कूलमध्ये फायटर कॉम्बॅट लीडरचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यांनी टेस्ट पायलट म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.शुभांशु हे लढाऊ नेता आणि चाचणी वैमानिक आहेत त्याच्याकडे सुमारे दोन हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA) माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी Su-30 MKI, MiG-21, MiG-29, Jaguar, Hawk, Dornier, AN-32 ही विमाने उडवली आहेत. 39 वर्षीय शुभांशु शुक्ला हे ISS मोहिमेसाठी निवडले गेलेले सर्वात तरुण भारतीय अंतराळवीर आहेत.
काय आहे Axiom-4 मिशन?
Axiom-4 मिशन चालू वर्षाअखेरपासून ते 2025 मध्ये राबवण्यात येऊ शकते. Axiom Space ही एक खाजगी अंतराळ कंपनी असून, हे त्यांचे चौथे मिशन आहे. स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन नऊ रॉकेटच्या साह्याने क्रू ड्रॅगन अवकाशयाना मार्फत ही मोहीम पार पडेल. या मोहिमेत 4 अंतराळवीर अवकाशात जाऊन अवकाश स्थानकावर पोहोचणार आहेत, हे मिशन एकूण 14 दिवसांचे असणार आहे.
या मोहिमेत भारतीय अंतराळवीरांसह अमेरिका, पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीरही सामील असतील. प्रसिद्ध SpaceX कंपनीचे रॉकेट आणि Crew Dragon हे अवकाशयान या सर्व प्रवासासाठी वापरले जातील. भारतीय अंतराळवीरांची निवड भारतीय वायुसेनेच्या (IAF) टेस्ट पायलट गटातून केली गेली आहे. त्यात ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला यांचा समावेश आहे.
स्पेसएक्सचे Crew Dragon अंतराळयान फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण करेल आणि फाल्कन 9 रॉकेट यासाठी वापरण्यात येईल. यामध्ये पोलंड, अमेरिका आणि हंगेरीचे अंतराळवीरही असतील.