टाटा इलेक्ट्रॉनिक्सने भारताच्या टेक उत्पादन क्षेत्रात एक मोठा बदल घडवला आहे. भारतीय दिग्गज कंपनीने पेगाट्रॉनच्या चेन्नईमधील iPhone उत्पादन कारखान्यात 60 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे भारतातील प्रमुख Apple suppliers म्हणून टाटाची जागा मजबूत होईल तसंच मार्केटमधील स्थानही वाढेल. या कारखान्यात सुमारे 10,000 कर्मचारी आहेत. दरवर्षी 5 दशलक्ष iPhones ची उत्पादन क्षमता असलेला हा कारखाना टाटाचा तिसरा मोठा iPhone उत्पादन केंद्र आहे.
टाटा आणि पेगाट्रॉन यांच्यामधील ही चर्चा एप्रिल 2024 पासून सुरू आहे. अद्याप अंतिम करार झाला नसला तरी, दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार आंतरिकदृष्ट्या जाहीर करण्यात आला आहे. पुढे ते भारतीय स्पर्धा आयोगाकडून आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी तयारी करत आहेत.
चीन-तैवानमधील तणाव
चीन आणि तैवानमधील तणाव वाढल्यामुळे Apple आपले जास्तीत जास्त उत्पादन बाहेर नेण्याचा प्रयत्न करत आहे. भारत हा या विस्तारातील एक प्रमुख देश आहे. तैवानी कंपनीचा पेगाट्रॉनचा चेन्नईमधील प्लांट हा भारतातील एकमेव उपक्रम होता. भारतातील उत्पादन केंद्र वाढवण्यासाठी, टाटा ग्रुपने या आधी विस्ट्रॉन कंपनीकडून कर्नाटकमधील आयफोन असेंब्ली प्लांट खरेदी केला होता.
टाटाचे भारतातील आयफोनच्या उत्पादनासाठी मोठे पाऊल
टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या चेन्नई प्लांटमध्ये हिस्सा खरेदी केल्यामुळे टाटा समूह आयफोनच्या उत्पादन योजनांमध्ये आणखी झपाट्याने वाढ करणार आहे. सध्या टाटा समूह कर्नाटकमधील आयफोन असेंब्ली प्लांट चालवत असून, तामिळनाडूतील होसूरमध्ये iPhone कंपोनंट प्लांट आहे. यासह, टाटा समूह होसूरमध्ये आणखी एक आयफोन असेंब्ली प्लांट तयार करणार आहे.
टाटा समूह त्याच्या महत्वाकांक्षी योजनांचा विस्तार करत असून उत्पादन क्षेत्रात वाढ करण्यासोबतच, भारतात Apple च्या किरकोळ विक्री व्यवसायातही प्रवेश करण्याची त्यांची योजना आहे. टाटा ग्रुप इन्फिनिटी रिटेल विभागत 100 छोटे Apple स्टोअर्स देशभर सुरू करणार आहेत. यामुळे, किरकोळ विक्री क्षेत्रातही टाटाची पकड मजबूत होईल.
होसूरमधील टाटाच्या नवीन प्रकल्पासाठी तयारी सुरू आहे. 250 एकर क्षेत्र व्यापणारा हा नवीन iPhone असेंब्ली प्लांट सुमारे 50,000 कामगारांना रोजगार देईल, ज्यात महिलाही असतील.
टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या या नवीन करारामुळे Apple च्या भारतातील उत्पादन क्षेत्राला आणखी चालना मिळणार आहे.