पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्याहून परतताना आपल्यासोबत भारतातील 297 पुरातन वस्तू आपल्यासोबत घेऊन आले आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वत: या वस्तू पंतप्रधानांच्या हाती सोपवल्या आहेत.
विविध आक्रमणांच्या वेळी आपल्या देशातील सांस्कृतीक वास्तूंची मोठ्या प्रमाणावर तोडमोड झाली. तर अनेक मौल्यवान वस्तूंची चोरी वा तस्करी केली गेली. अशा विविध माध्यमातून देशाबाहेर गेलेला हा अमूल्य ठेवा आपल्याला परत मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स पोस्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, सांस्कृतिक बंध जोडताना सांस्कृतिक संपत्तीचं जतन करणं गरजेचं आहे. अशावेळी सांस्कृतिक वस्तूंच्या तस्करीविरोधी लढाई लढणंही आवश्यक आहे. तस्करीमुळे भारताच्या देशाबाहेर गेलेल्या अशाच 297 पुरातन वस्तू आज अमेरिकेकडून परत मिळत असल्याचा आनंद आहे. यासाठी अमेरिकेचे खूप खूप आभार.
Deepening cultural connect and strengthening the fight against illicit trafficking of cultural properties.
I am extremely grateful to President Biden and the US Government for ensuring the return of 297 invaluable antiquities to India. @POTUS @JoeBiden pic.twitter.com/0jziIYZ1GO
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2024
कारण या वस्तू केवळ ऐतिहासिक वस्तू नसून भारताच्या सांस्कृतिक, सर्जनशील आणि सभ्यतेचं प्रतिक आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे व्यक्तिश: आभार मानले.
भारताची ‘अप्सरा’ आली
जवळपास 4 हजार वर्षापूर्वीच्या वस्तूंचा या वस्तूमध्ये समावेश आहे. देशभरातील विविध भागातील कला वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. टेराकोटा, दगड, विविध धातू, लाकडांपासून बनवलेल्या कलात्मक वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. यातल्या मुख्य आकर्षण असलेल्या वस्तू पुढीलप्रमाणे :
• दहाव्या ते अकराव्या शतकात सँडस्टोनपासून बनवलेली अप्सरा ही मूर्ती मनमोहक मूर्ती
• पंधरा आणि सोळाव्या शतकातील जैन तीर्थंकार यांची कांस्य धातूमधील मूर्ती
• तिसऱ्या व चौथ्या शतकातील टेराकोटापासून बनवलेल्या फुलदाण्या
• दक्षिण भारतातील दगडापासून बनवलेल्या मूर्ती
• दक्षिण भारतात सतराव्या – अठराव्या शतकात निर्मिलेली कांस्य धातूची गणेश मूर्ती
• पंधराव्या – सोळाव्या शतकातील सँडस्टोनपासून बनवलेली भगवान बुध्दाची मूर्ती
• सतराव्या – अठराव्या शतकातील कांस्य धातूने बनवलेली भगवान विष्णूची मूर्ती
• तांब्याच्या धातूमध्ये घडवलेल्या मानवी आकृत्या
• सतराव्या – अठराव्या शतकातील कांस्य धातूमध्ये घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती
• तेराव्या-चौदाव्या शतकात ग्रॅनाइटमध्ये घडवलेली भगवान कार्तिकेय यांची मूर्ती
640 पुरातन वस्तू भारतात परत
आत्तापर्यंत एकूण 640 पुरातन वस्तू या भारताला परत मिळाल्या आहेत. यापूर्वी विविध देशातून 343 वस्तू या भारतात परत आणण्यात परराष्ट्र खात्याला यश मिळालं आहे. यापैकी 569 वस्तू या अमेरिकेतून परत मिळवल्या आहेत.
सन 2016 पासून अमेरिकेने भारताला तस्करी वा चोरून अमेरिकेत आणलेल्या अनेक पुरातन वस्तू परत केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या जून 2016 च्या दौऱ्यात अमेरिकेने 10 वस्तू परत केल्या होत्या. तर सप्टेंबर 2016 च्या दौऱ्यावेळी 157 आणि जून 2023 मध्ये 105 वस्तू परत मिळल्या आहेत.