देशभरातल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी आता विविध तपास यंत्रणांना आणि पोलिस स्थानकांना ‘भारतपोल’ पोर्टल वापरता येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी ‘भारतपोल’ पोर्टल लॉन्च केलं. केंद्रीय तपास यंत्रणेनं (CBI) ने हे पोर्टल विकसीत केलं आहे.
जाणून घेऊयात हे पोर्टल नेमकं काय आहे आणि तपास यंत्रणेत त्याचा कसा उपयोग होणार आहे.
‘भारतपोल’ पोर्टल
भारतपोल पोर्टल हे इंटरपोल पोर्टलवर आधारित आहे. इंटरपोल पोर्टल हे एकूण 195 देशातील पोलिस तपास यंत्रणांचा गट आहे. या अंतर्गत सहभागी देशांमधील गुन्हेगार जर देशातून पळून या गटातल्या कोणत्या एका देशात पळून गेले असतील तर, त्यांचा तपास करणं आणि अशा गुन्हेगारांचं हस्तांतरण करण्याची प्रकिया इंटरपोल पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. याच धर्तीवर आता देशांतर्गत पातळीवर गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी ‘भारतपोल’ पोर्टल वापरण्यात येणार आहे.
हे पोर्टल राज्या-राज्यातल्या पोलिस स्थानकांशी आणि देशातल्या सर्व तपास यंत्रणांशी जोडलेलं असणार आहे. यामध्ये प्रत्येक पोलिस स्थानकाला गुन्ह्याची आणि आरोपीची माहिती अपलोड करायची आहे. या माहितीच्या आधारावर संबंधित अन्य पोलिस स्थानकंही गुन्हेगारांना शोधण्यास मदत करणार आहेत. यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला वेग मिळणार आहे.
गुन्हे तपासाचा वेग वाढणार
सध्या सीबीआय, एनआयए, युनीट ऑफिसर्स आणि स्थानिक पोलिस प्रशासनांमध्ये एखाद्या गुन्ह्याचा शोध घ्यायचा असेल, आरोपीची माहिती मिळवायची असेल तर पारंपरिक पत्र व्यवहार, ई-मेल्स, फॅक्स अशा पद्धतीच्या माध्यमातून संवाद साधावा लागायचा. यामुळे तपासामध्ये दिरंगाई व्हायची.
मात्र, आता गंभीर स्वरूपातील गुन्हे ज्यामध्ये विविध राज्यांच्या पोलिस यंत्रणा आणि राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणाच्या मदतीने तपास करावा लागणार आहे, अशा गुन्ह्यांची माहिती या पोर्टलवर असणार आहे. यामध्ये सायबर क्राईम, संघटीत गुन्हेगारी, अंमली पदार्थाची तस्करी, मानवी तस्करी अशा गुन्ह्यांचा समावेश होतो.
अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपी हे देशाबाहेर पळून गेल्यावर तपास करणं आणि खटला निकाली काढण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. बऱ्याचदा हे गुन्हेगार परदेशात मोकाट फिरत असतात. यासाठी स्थानिक पातळीवरील पोलिस या भारतपोल पोर्टलच्या माध्यमातून इंटरपोल पोर्टलला एखाद्या आरोपीची माहिती देऊन गुन्हेगाराच्या हस्तांतरणासाठी विनंती करु शकतात. इंटरपोलने ही विनंती मान्य केल्यावर, कमी अवधीत स्थानिक तपास यंत्रणा गुन्हेगाराचा ताबा घेऊ शकतात.
सन 2024 मध्ये, भारताने इंटरपोलच्या माध्यमातून अशा एकूण 26 गुन्हेगारांना परदेशात पकडून आणलं आहे. तर 2021 पासून जवळपास 100 गुन्हेगारांचं भारतात हस्तांतरण केलेलं आहे. परदेशात गेलेल्या गुन्हेगारांच्या हस्तांतरण प्रक्रियेला गती देण्यासाठी आता भारतपोल पोर्टलची मदत होणार आहे.
रियल टाइम इंटरफेस
रियल टाइम इंटरफेस म्हणजे गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची देशभरातल्या तपास संस्थांशी तात्काळ माहिती शेअर करुन तपास करणं हे भारतपोलचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट आहे.
स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळीवरील गुन्हेगारासंबंधित माहिती या पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. तसचं गुन्हेगारांच्या तपासासाठी या पोर्टलवरुन रेड कॉर्नर नोटीस ही बजावता येऊ शकते.
अनेकदा गुन्हेगार हे गुन्हे करुन परदेशात पळून जातात. परदेशात गेल्यावर त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात अडचण येते. मात्र, इंटरपोल आणि आता भारतपोलच्या माध्यमातून कोणत्याच गुन्ह्यातला गुन्हेगार हा वाचू शकत नाही.
भारतपोल पोर्टलचे मुख्य वैशिष्ट्ये
कनेक्ट, इंटरपोल नोटीस, रेफरन्सेस, ब्रॉडकास्ट आणि रिसोर्सेस हे भारतपोलचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
कनेक्ट – देशांतर्गत कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या आणि तपास यंत्रणांना इंटरपोलच्या राष्ट्रीय केंद्रीय कार्यालयाचे विस्तारीत यंत्रणा म्हणून काम करता येणार आहे.
इंटरपोल नोटिस – भारतपोलच्या माध्यमातून स्थानिक तपास यंत्रणांना 195 देशांतील तपास यंत्रणांचं जाळं असलेल्या इंटरपोलशी संपर्क साधून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांच्या तपासासाठी नोटिस प्रसिद्ध करुन मदत घेता येईल.
ब्रॉडकास्ट – इंटरपोलमधील 195 देशांशी आरोपिची माहिती शेअर करुन तात्काळ मदत मिळवणे.
रिसोर्सेस – या पोर्टलच्या माध्यमातून गुन्ह्याची आणि आरोपी संबंधित कागदपत्रांची माहिती हस्तांतरण करुन तपास पूर्ण करणे.