कोणाला कोणता छंद असेल आणि तो किती व कशाप्रकारे जपण्याची आवड असेल याविषयी कोणी काही सांगू शकत नाही. हिंदीमध्ये एक शायरी आहे, “शौक बडी चीज हे साहब, इसमे कोई हद से गुजरता हैं, तो कोई बेहद गुजरता हैं…” आणि असंच काहीसं घडलंय कर्नाटकमध्ये. कर्नाटकमधल्या एका शेतकऱ्यांने बैलगाडी शर्यतीसाठी तब्बल 36 लाखांची बैलाची एक जोडी खरेदी केली आहे.
36 लाखाच्या बैलजोडीचा धनी कोण?
कर्नाटकमध्ये सणावरांच्या काळात बैलगाडी शर्यत आयोजीत करतात. खेडेगावात आणि निमशहरी भागात या शर्यतीला खूप महत्त्व आहे. लोकं मोठ्या उत्साहाने या शर्यतीसाठी आवश्यक असलेल्या चांगल्या बैलांची खरेदी करत, या शर्यतीत मोठ्या संख्येने भाग घेतात.
याच शर्यतीची तयारी करण्यासाठी कर्नाटकातल्या महालिंगपूर नगरपरिषदेचे अध्यक्ष यल्लंगौडा पाटील यांनी तब्बल 36 लाखाच्या बैलाच्या जोडीची खरेदी केली आहे. आजूबाजूच्या परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे. साधारणत: दसऱ्याच्या दरम्यान शर्यतीचं आयोजन केलं जातं. तेव्हाच शर्यतीत भाग घेणारे नवीन बैलजोडीची खरेदी करतात. मात्र, यल्लंगौडा पाटील यांनी आताच बैलजोडीची खरेदी करत शर्यतीच्या तयारीला सुरूवात केली आहे.
बैलजोडीची किंमत 10 – 15 लाख
साधारणत: 10 – 15 लाखाला बैलजोड्या विकल्या जातात. मात्र, पाटील यांनी खरेदी केलेल्या बैलजोडीची किंमत ही दुपटीपेक्षाही अधिक आहे. मुळात शर्यतीसाठी चांगल्या दमदार, चपळ बैलजोडीची गरज असते. पाटील यांनी खरेदी केलेल्या बैलजोडीने आजपर्यंत दहा शर्यती जिंकल्या आहेत. या बैलजोडीचा आधीचा मालक या जोडीला विकत असल्याचं कळल्यावर, पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जोडी विकत घेण्याचे ठरवले.
यल्लगौडा पाटील यांच्या कुटुंबांचे बैल दरवर्षी शर्यतीत भाग घेतात. यंदा त्यांना दसऱ्याच्या वेळी मुधोळ येथे होणाऱ्या बैल शर्यतीत भाग घ्यायचा आहे. म्हणून या कुटूंबियांनी नवी बैलजोडी खरेदी करून शर्यतीची तयारी सुरू केली आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक जास्त किंमतीने खरेदी केलेली ही बैलजोडी असल्याचं ही पाटील यांनी सांगितलं.