नाताळ हा येशु ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव. आठवडाभर ख्रिसमसचा जल्लोष सुरूच राहणार आहे. आजही आपल्या घरात लहान बाळ जन्माला आलं की, त्या घरात आनंदाचं उधाण येतं. दोन हजार वर्षापूर्वीही येशु ख्रिस्ताच्या जन्माने इस्त्रायलमधल्या बेथलेहेम नगरात मरीया माता, संत योसेफ आणि मेंढपाळांमध्ये असाच आनंद पसरला होता. मात्र, या आनंदाला गालबोट लागणारी घटना त्यावेळी जेरुसलेममध्ये (बायबलमधील उल्लेख येरुसलेम) घडली होती.
येशु ख्रिस्ताच्या जन्मानंतर इस्त्रायलचे तत्कालीन राजे हेरोद यांनी बेथलेहेममधल्या नवजात बालकांची हत्या केली. या निष्पाप बालकांच्या स्मरणार्थ ख्रिसमसदरम्यान 28 डिसेंबर रोजी ‘फिस्ट ऑफ द होली इंनोसंटस्’ हा विशेष दिवस साजरा केला जातो.
सत्तेच्या हव्यासापायी नवजात बालकांचा नाश
येशु ख्रिस्ताच्या जन्मावेळची ही घटना आहे. त्यावेळी हेराल्ड म्हणजेच हेरोद राजे हे संपूर्ण इस्त्रायलचे राजे होते. आपली सत्ता निरकुंश असावी, हीच त्यांची इच्छा होती. एके दिवशी तीन ज्ञानी लोक हे हेरोद राजाकडे आले. या तीन ज्ञानी लोकांना यहुद्याचा राजा येशु ख्रिस्त जन्माला आल्याचं स्वप्न पडलं होतं. त्यामुळे त्या स्वप्नाचा पाठलाग करीत ते येशु ख्रिस्ताचा शोध घेत हेरोद राजाच्या राजवाड्यात पोहोचले. त्यांनी त्यांना मिळालेला संदेश हेरोद राजाला सांगितला की, “यहुद्याचा राजा ज्याची सर्वजण वाट पाहत आहेत तो अखेर जन्माला आला आहे”. हे ऐकून हेरोद राजा हादरले. आपली सत्ता आता संपुष्टात येणार याची त्यांना भिती वाटली. राजानी या तिन्ही ज्ञानी लोकांचा पाहुणचार करुन त्यांना पुढच्या प्रवासासाठी पाठवलं. जाताना त्यांना सांगितलं की, येशु ख्रिस्ताचं दर्शन झाल्यावर आम्हालाही त्याच्या ठिकाणाबद्दल सांगा म्हणजे आम्हीही त्याचं दर्शन घेऊ. मात्र हेरोद राजाच्या मनात येशु ख्रिस्ताच्या हत्येचा कट शिजत होता.
हे तिन्ही ज्ञानी लोक बेथलेहेम नगरात पोहोचले. त्यांनी बाळ येशु ख्रिस्ताचं दर्शन घेतलं. तिथून ते आल्या वाटेने परत जात होते. मात्र, त्यावेळी वाटेत त्यांना संदेश मिळाला की, “पुन्हा हेरोद राजाकडे जाऊन येशु ख्रिस्ताच्या ठिकाणाची माहिती नका देऊ”. त्यामुळे या ज्ञानी लोकांनी आपला मार्ग बदलला आणि ते त्यांच्या घरी परतले.
हेरोद राजे हे ज्ञानी लोकांच्या निरोप्याची वाट पाहत होते. पण ते येत नाहीत हे पाहून त्यांनी त्यावेळी खूप भयंकर निर्णय घेतला. बाळ येशु नेमका कोण आहे? कोणत्या घरात त्याने जन्म घेतला आहे? याची माहिती नसल्यामुळे हेरोद राजाने बेथलेहेम नगरातल्या दोन वर्षाखालील सर्व बाळांची हत्या करण्याचा आदेश दिला. राजाच्या या आदेशानुसार शिपायांनी बेथलेहेम मधल्या सर्व दोन वर्षाखालील नवजात मुलांची हत्या केली.
येशु ख्रिस्त हा एका गव्हाणीत म्हणजे गाईच्या गोठ्यात जन्माला आला, त्यामुळे त्यांचा यातून बचाव झाला. तत्कालीन बायबल पंडितांच्या माहितीनुसार, बेथलेहेम नगरीची लोकसंख्या पाहता सुमारे 25 बालकांची हत्या केल्याची नोंद त्यांनी केली आहे.
येशु ख्रिस्ताच्या अप्रत्यक्ष संरक्षणार्थ या 25 बालकांनी बलिदान दिलं. त्यामुळे या बालकांना ख्रिस्तसभा ‘रक्तसाक्षी’ म्हणून संबोधते. त्यांच्या स्मरणार्थ 28 डिसेंबर हा दिवस ‘निष्पाप बालकांचा सण’ म्हणून साजरा करतात.
फिस्ट ऑफ द होली इंनोसंटस्
ख्रिस्तसभा हा सण साजरा करित असताना, 28 डिसेंबरला लहान मुलांसाठी विशेष मिस्साबलिदानाची प्रार्थना करते. सर्व मुलांना आशिर्वाद देऊन प्रार्थना केली जाते. मिस्साबलिदानानंतर चर्चच्या परिसरामध्ये मुलांसाठी विविध खेळ आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमासह मुलांसोबत स्नेहभोजन केलं जातं.