तुमच्यापैकी अनेकांनी एका देशातून दुसऱ्या देशात जाणारी नदी, रस्ते, समुद्र असं ऐकलं असेल, पाहिलंही असेल. पण दोन राज्यात विभागलेलं रेल्वे स्टेशनबद्दल माहीत आहे का? नंदुरबार जिल्ह्यातील ‘नवापूर’ हे रेल्वेस्थानक दोन राज्यांमध्ये विभागलेलं आहे. हे रेल्वे स्थानक दोन राज्यांच्या सीमेवर बांधलेले आहे. या रेल्वे स्थानकाचा अर्धा भाग हा आपल्या महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यात आहे. तर अर्धा भाग हा गुजरातच्या तापी जिल्ह्यात आहे.
स्टेशनवर चार भाषांमध्ये घोषणा!
नवापूर हे रेल्वे स्थानक अनेक अर्थानी अद्वितीय आहे. रेल्वेच्या या अनोख्या अशा स्थानकावर रेल्वे संदर्भात सर्व प्रकारची माहिती चार भाषांमध्ये लिहिण्यात आली आहे. मराठी, गुजराती, इंग्रजी आणि हिंदी भाषांचा वापर माहिती देण्यासाठी केला जातो. या रेल्वे स्थानकावर याच चार भाषांमध्ये घोषणाही / अनाउन्समेंट या चार भाषांमध्येच केल्या जातात. या अनोख्या स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना एक वेगळंच वातावरण अनुभवण्यास मिळतं.
रेल्वेचा बाकंही दोन राज्यात विभागलेला
एकूण 800 मीटर लांब असलेल्या नवापूर या रेल्वे स्थानकाचा 300 मीटरचा भाग महाराष्ट्रात येतो, तर सुमारे 500 मीटर भाग हा गुजरातमध्ये येतो. गंमत म्हणजे इथल्या प्लॅटफॉर्मवर एक बाक आहे, ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आहे आणि अर्धा भाग गुजरातमध्ये आहे. या दोन राज्यांच्या बाकावर बसण्यासाठी आणि फोटो घेण्यासाठी प्रवाशांची चढाओढ बघायला मिळते.
फाळणीपूर्वी झाली होती बांधणी
पूर्वीच्या एकत्रित असलेल्या मराठी आणि गुजराथी भाषिक प्रांतांची 1 मे 1960 रोजी विभागणी होऊन महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये स्थापन झाली. या विभागणीच्या वेळी नेमकं हे स्टेशन दोन्ही राज्यांच्या सीमेवर आले. त्यानंतर दोन राज्यांमध्ये विभागले असले तरी हे रेल्वे स्थानक आहे तसेच सीमेवर ठेवावे असा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेताना हे स्टेशन कोणत्याही एका राज्यात घेता आले असते. मात्र तसे करण्यात आले नाही. दोन राज्यांमध्ये असलेल्या या रेल्वे स्थानकाची आता वेगळी ओळख झाली आहे.
स्टेशनवर सेल्फी पॉईंट
सोशल मीडियाकडे लोकांचा वाढता कल पाहता येथे सेल्फी पॉइंटही बनवण्यात आला आहे. इथं मोठ्या संख्येने प्रवासी फोटो काढतात. त्याहूनही मजेशीर गोष्ट म्हणजे नवापूर स्टेशनचे स्टेशन मास्तर गुजरातमध्ये बसतात, तर त्यांची खिडकी महाराष्ट्रात येते.