आजकाल सगळ्यांनाच स्लिम आणि फिट दिसायचं असतं. त्यासाठी लोक अनेक प्रकारचे डायट्स आणि व्यायाम करतात. पण वजन कमी करण्याच्या या स्पर्धेत आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.
तसचं , वजन वाढल्याने अनेक गंभीर आजारांचे निमंत्रण मिळते, जसे की उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, हृदयविकार, पित्ताशयाचा त्रास, हाडांच्या समस्या, घोरणे, कर्करोग, मानसिक ताण इ.
वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे डायट्स, व्यायाम पद्धती बाजारात उपलब्ध आहेत. पण यापैकी बहुतेक डायट्स आपल्या शरीराला हानिकारक असतात. या डायट्समुळे आपण अगदी कमी दिवसात वजन कमी करू शकतो, पण दीर्घकाळ हे टिकवून ठेवणे जवळपास अशक्य असते. असे कोणतेही डाएट करण्याआधी ह्या डाएटमधील फरक, साम्य आणि त्याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम आपण जाणून घेऊ.
सगळ्याच लोकप्रिय डाएटमध्ये काही समान नियम असतात : १) तुम्हाला एकूण आहार कमी करायला लावणे. २) तुमच्या एकूण कैलरीज कमी करणे. ३) तुमच्या शरीराला जास्त कॅलरीज बर्न करायला लावणे. ४) झटपट वजन कमी करून देणे.
लोकप्रिय फॅड डाएट्स
जीएम डाएट- एक आठवड्यात 7 किलो पर्यंत वजन कमी करण्याचे आकर्षक वाटणारे हे डाएट आहे. यात फळे, भाज्या, चिकन आणि मासे यांचा मर्यादित आहार असतो. वजन कमी होते पण हा डायट थांबवल्यावर वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असते.
800 कॅलरी डाएट- 800 कॅलरी डायट हा अत्यंत कमी कॅलरीज असलेला आहारक्रम आहे. या डायटचा उद्देश एका आठवड्यात किंवा काही आठवड्यांत जास्तीत जास्त वजन कमी करणे हा असतो. ह्या डाएटमुळे वजन कमी होत असले तरी अशक्तपणाही लगेच येतो.
डेअरी फ्री आणि ग्लुटेन फ्री- गहू आणि दुधजन्य पदार्थ टाळणे. वजन कमी होण्यासोबतच काही आरोग्य समस्या असलेल्यांना या डायटचा फायदा होतो.
इंटरमिटंट फास्टिंग- दिवसातून काही तास उपवास आणि विशिष्ट वेळेतच खाणे. वजन कमी होते आणि मधुमेह नियंत्रणात राहतो.
किटो डाएट- या डाएटमध्ये खूप जास्त फॅट, थोडे प्रोटीन आणि कमी कार्बोहायड्रेट्स घेतले जातात. वजन कमी होते पण दीर्घकाळ हे डाएट करणे कठीण असते.
OMAD (One Meal A Day)– दिवसातून एकदाच जेवण करणे. वजन कमी होते पण शरीरावर ताण येऊ शकतो.
वजन कसे कमी करायचे ?
वजन कमी करण्याच्या ट्रेंडमध्ये लक्ष ठेवणे आणि आरोग्याची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहेच. पण वजन कसे वाढले आणि त्यासाठी दैनंदिन जीवनशैलीमध्ये काय बदल करावा लागेल, या गोष्टी आधी समजून घेतल्या पाहिजेत तरच तुम्हाला योग्य प्रकारे वजन कमी करता येईल. कधीही गडबडीत वजन कमी करण्याचे टार्गेट ठरवू नका. हे लक्षात ठेवा, वजन कमी करणे एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे, आणि त्यासाठी शरीराला वेळ देणे तितकच महत्त्वाचे आहे. कोणत्याही ट्रेंडसच्या मागे जाताना आपल्या शरिराला ओळखून मगच काय ते ठरवा. नाहीतर या डाएटचा वाईट परिणाम शरिरावर होऊ शकतो.