SIP (Systematic Investment Plan) तर एकदम प्रसिद्ध झालंच आहे. त्या पाठोपाठ SWP (Systematic Withdrawal Plan) सुद्धा आता लोकापर्यंतबऱ्या पैकी पोहोचला आहे. आज एका तिसऱ्या ऑप्शन बद्दल बघुया –
बहुतेक वेळा SIP द्वारे गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना एक दिलासा असतो की, दर महिन्याला गुंतवणूक होत असल्यामुळे मार्केट मधल्या चढ उताराची आपोआप काळजी घेतली जाते. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांची प्रथम पसंती या ऑप्शनला दिली जाते. पण जेव्हा एकाच वेळी मोठी गुंतवणूक करायची वेळ येते अशा वेळी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना बऱ्याच जणांना भीती असते की गुंतवणूक केल्यावर मार्केट पडलं तर काय ? त्यामुळे जास्त परताव्याची शाश्वती असताना सुद्धा म्युच्युअल फंडाऐवजी Fixed Deposits ना प्राधान्य दिलं जातं.
अशा वेळी म्युच्युअल फंडात एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवायची असेल आणि मार्केटच्या चढ उताराची भीती वाटत असेल तर STP (Systematic Transfer Plan) हा अतिशय योग्य पर्याय ठरतो.
STP (Systematic Transfer Plan) म्हणजे काय ?
STP या पद्धतीत तुम्ही तुमची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एका फंड मधून त्याच कंपनीच्या दुसऱ्या फंडात ट्रान्स्फर करू शकता. आता ही गुंतवणूक ट्रान्स्फर कधी करायची हे पूर्णपणे तुम्ही ठरवू शकता. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही A फंडात 1 लाख रुपये गुंतवले आणि दर आठवड्याला त्यातले 5 हजार रुपये तुम्ही B फंडात ट्रान्स्फर करायची सूचना दिलीत. तर दर आठवड्याला 5 हजार याप्रमाणे साधारण 20 आठवड्यात पूर्ण रक्कम B फंडात ट्रान्स्फर होईल. SIP मध्ये जशी तुमच्या बँक अकाउंट मधून ठरवलेल्या दिवशी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जाते त्याचप्रमाणे STP मध्ये बँक अकाउंट ऐवजी एका फंडातून दुसऱ्या फंडात रक्कम ट्रान्स्फर होते. हे करताना मूळ रक्कम ज्या फंडात गुंतवली जाणार आहे तो Liquid Mutual Fund असावा. अशा प्रकारच्या फंडात मार्केट रिस्क सगळ्यात कमी असते आणि परतावा साधारणपणे 5-6% च्या आसपास मिळतो. अशा प्रकारच्या फंडातून जास्त रिस्क आणि जास्त परतावा देणाऱ्या Equity फंडात रक्कम ट्रान्स्फर करावी. यामुळे तुमची Lumpsum गुंतवणूक SIP सारख्याच पद्धतीने तुम्ही गुंतवू शकता.
STP चे फायदे –
- दर दिवशी, दर आठवड्याला, दर महिन्याला अशा वेगवेगळ्या कालावधी प्रमाणे तुम्ही तुमची गुंतवणूक Liquid फंडातून Equity फंडात ट्रान्स्फर करू शकता, त्यामुळे मार्केट मधल्या चढ उताराची आपोआप काळजी घेतली जाते.
- गुंतवणूक केल्या केल्या मार्केट पडलं तरी तुमची गुंतवणूक सुरक्षित रहाते. उलट खाली पडलेल्या मार्केटचा फायदा तुमच्या ट्रान्स्फर होणाऱ्या मुद्दलाला मिळतो.
- Liquid फंडातील रक्कम 5-6% चा परतावा देत असते.
- अशा व्यक्ती ज्या व्यावसायिक आहेत किंवा ज्यांना अनियमित उत्पन्न मिळते आणि त्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी STP हा अतिशय उपयोगी पर्याय ठरतो.
STP चे तोटे –
अर्थात प्रत्येक गुंतवणूक पद्धतीत काहीतरी तोटे देखील असतात, ते खालील प्रमाणे –
- मार्केट अचानक वधारल तर मोठ्या नफ्याची संधी या गुंतवणूक प्रकारात आपण गमावून बसतो.
- जेव्हा एका फंडातून दुसऱ्या फंडात रक्कम ट्रान्स्फर होते, अशा वेळी टॅक्स च्या दृष्टीने एका फंडात विक्री आणि दुसऱ्या फंडात खरेदी अशा प्रकारे व्यवहार पकडला जातो त्यामुळे पहिल्या फंडात झालेल्या नफ्यावर टॅक्स भरावा लागतो.
ज्या गुंतवणूकदारांना मार्केट मधील चढ उताराची भीती वाटते पण Lumpsum गुंतवणूक करायची इच्छा असेल, अशा लोकांसाठी STP (Systematic Transfer Plan) हा अत्यंत योग्य पर्याय आहे..
2 Comments
https://www.facebook.com/share/p/1YGr6zzTz8/
Manoj Bhagwat