चित्रपट क्षेत्रातील जगातल्या मोठ्या पुरस्कार सोहळ्यात अर्थातच जगभरातले नामांकित कलाकार आले होते. त्यांचे फॅन्सी ड्रेसेस, फॅशन्स सगळं काही ग्लॅमरस होतं. पण चर्चा रंगली ती मात्र या मराठमोळ्या अभिनेत्रीचीच…अगदी तिच्या कपड्यांपासून ते तिच्या दिसण्यापर्यंत सगळ्याची नोंद जगभरातील मीडियानं घेतली. पण या सगळ्यात वरचढ ठरला तो तिचा अभिनय. आपल्या अगदी नैसर्गिक अभिनयानं प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या या अभिनेत्रीची जागतिक स्तरावरही दखल घेतली गेली. तिचं नाव छाया कदम! अगदी आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवणाऱ्या भूमिका करणाऱ्या छाया कदम यांचा अभिनय आंतरराष्ट्रीय पातळीवरही नावाजला गेला आहे. म्हणूनच तर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये छाया तिच्या आईची साडी आणि नथ घालून पोहोचली तेव्हा सगळ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या. याच महोत्सवात त्यांच्या ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाला ज्युरी पुरस्कारही मिळाला.
‘लापता लेडीज’ची ‘मंजु माई’
अगदी साधा, सहज अभिनय करणाऱ्या छाया कदम घराघरांत पोहोचली ती ‘लापता लेडिज’मधल्या ‘मंजु माई’च्या भूंमिकेमुळे. दिसायला कडक, रागीट पण आतून तितकीच मायाळू असलेल्या मंजुमाईच्या भूमिकेला छायानं आपल्या अभिनयानं वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवलं. त्यामुळेच कदाचित या कलाकारांच्या मुख्य भूमिकांएवढीच किंबहुना थोडी जास्तच छाया कदमची ‘मंजु माई’ लक्षात राहिली. पण फक्त मंजु माईच नाही तर छायाची याआधीची प्रत्येक भूमिका लक्षात राहण्यासारखीच आहे.

राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू
मुंबईतल्या कलिना भागात एका मध्यमवर्गीय कुटुंबात छायाचं बालपण गेलं. त्यांचं मूळ गाव कोकणातलं. तिचे वडील गिरणी कामगार होते. छायाला मोठं झाल्यावर कबड्डी खेळाडू व्हायचं होतं किंवा स्वत:ची जिम उघडायची होती. ती राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू होती. पण अभिनयात कारकिर्द होईल, असं तिला लहानपणी स्वप्नातही वाटलं नव्हतं. खेळामध्ये इंटरेस्ट असल्यानं आणि चांगली शरीरयष्टी असल्याने पोलीसमध्ये भरती व्हावं असा विचारही तिच्या मनात आला होता. या दरम्यान अभिनयाचा विचारही कधी मनात आला नव्हता.
दुःखातून बाहेर पडण्यासाठी…
मात्र 2001 मध्ये छायानं राष्ट्रीय नाटक अकादमी (NSD) चे माजी संचालक वामन केंद्रे यांचं अभिनयाचं एक वर्कशॉप केलं. हाच तिच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा ठरला. या एकाच वर्षात छायानं तिच्या वडील आणि भावाला गमावलं होतं. त्या दु:खातून बाहेर पडायला तर या वर्कशॉपमुळे मदत झाली. त्याचबरोबर आपण अभिनय करु शकतं हे तिला समजलं आणि नवीन क्षेत्रं तिला खुणावू लागलं. तरीही या क्षेत्राबाबत काहीच माहिती नसल्याने किंवा कुणी ओळखीचंही या क्षेत्रात नसल्याने सहा वर्ष निघून गेली. सहा वर्षांनंतर वामन केंद्रे यांच्याच ‘झुलवा’ या नाटकातून तिनं स्टेजवर पदार्पण केलं.
‘झुलवा’ ते ‘सैराट’ प्रवास
झुलवानंतर चित्रपटांत काम मिळवण्यासाठी छायाला भरपूर संघर्ष करावा लागला. हिरॉईन म्हणजे गोरी, सुंदर, नाजूक असं समीकरण आपल्या भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अगदी पक्कं ठसलेलं आहे. त्यामुळे छायासाठी कामं मिळवणं सोपं नव्हतं. काही वेळेस ज्युनिअर आर्टिस्ट, असिस्टंट, छोट्या भूमिका असं जे मिळत गेलं ते छाया करत गेली. त्यातून तिच्या अभिनयाचा आणि व्यक्तिमत्वाचा विकास झाला असं ती मानते.
एका मालिकेच्या माध्यमातून तिची अरुण नलावडे यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या ओळखीमुळे एका चित्रपटातं काम मिळालं खरं, पण तो चित्रपट प्रदर्शितच झाला नाही. ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘सिंघम रिटर्न्स’ अशा चित्रपटांमध्येही त्यांनी छोट्या छोट्या भूमिका केल्या. पण खऱ्या अर्थानं त्यांना ब्रेक मिळाला तो नागराज मंजुळे यांच्या ‘फॅंड्री’ या चित्रपटातून. या चित्रपटात त्यांनी केलेल्या ‘नानी’ची भूमिका इतकी लोकप्रिय झाली की त्यांना ‘नानी’ म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. ‘फॅँड्री’नंतर नागराज मंजुळेंशी त्यांचे सूर जुळले. नागराज मंजुळेंचा सर्वात यशस्वी चित्रपट ‘सैराट’मध्ये त्यांनी केलेल्या सुमनअक्काच्या भूमिकेचंही कौतुक झालं. महत्वाचं म्हणजे या छोट्याशा भूमिकेसाठी तेलगु बोलणं आवश्यक होतं. छाया एका ड्रायव्हरकडून तेलगू भाषा शिकली होती. त्यानंतर आलेल्या ‘रेडू’, ‘झुंड’मध्येही छायानं काम केलं.
गॉडफादरशिवाय मिळवलेलं यश
त्यानंतर छाया कदम यांनी रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ या चित्रपटात केलेल्या आव्हानात्मक भूमिकेचीही चर्चा झाली. छाया कदम यांनी आपल्या अभिनयानं फक्त मराठीतच नाही तर बॉलीवूडमध्येही छाप सोडली. संजय लीला भन्साळी, किरण राव यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलं. भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या बहुचर्चित सिनेमामध्ये छायानं रश्मीबाईची भूमिका केली. ‘अंधाधुंद’ सिनेमातल्या ‘सखु’च्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं.
कोणताही गॉडफादर नसताना, अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही छाया कदम हे नाव केवळ स्वत:च्या गुणवत्तेच्या आधारावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. त्यांच्या अभिनयामुळेच किरण राव यांच्या ‘लापता लेडिज’मधली ‘मंजु माई’ची भूमिका मिळाली आणि या भूमिकेमुळे त्या अक्षरश: देशभरातल्या घराघरामध्ये पोहोचल्या. उत्तर प्रदेशच्या भाषेचा लहेजा असलेली बिनधास्त तरीही मायाळू मंजुमाई छायानं जीव ओतून साकारली. त्यामुळे भाषेच्या सीमा ओलांडून संपूर्ण देशभरातल्या प्रेक्षकांना मंजुमाई आपलीशी वाटली.
‘प्रयत्न करणे’ या मंत्राचा जप
एका साध्यासुध्या घरातून आलेल्या छाया कदमनं केवळ गुणवत्तेवर स्वत:ला सिध्द केलंय. टिपिकल हिरॉईनसारखा रंग, चेहरा नाही म्हणून निराश न होता छाया सातत्याने प्रयत्न करत राहिली. आपल्या सावळ्या रंगाचा तिला अभिमान आहे. आपल्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो अभिनयात करायला हवा असं तिला वाटतं. त्यामुळे ती प्रत्येक वेळेस स्वत:चं काम आणखी चांगलं कसं होईल याकडेच लक्ष देते. परिणामी तिची प्रत्येक भूमिका आधीपेक्षा वेगळी ठरते, लोकप्रिय होते.
भविष्यातही दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर ती काम करत आहे. स्वत:ला जमिनीवर ठेवण्यासाठी ती तिच्या माणसांमध्ये रमते, कोकणातल्या गावी जाते, तिच्या जीवलगांबरोबर छोटे छोटे प्रसंग साजरे करते. आणि पुन्हा फ्रेश होऊन कामाला लागते. छायाला 12 वीच्या परीक्षेत अपयश आलं होतं. पण तरीही ती डगमगली नाही. प्रयत्न करत राहिली. हाच मंत्र तिनं पुढंही लक्षात ठेवला. तिच्यामुळेच कान्ससारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या मराठीचा झेंडा अभिमानानं फडकला आणि आता ऑस्करच्या निमित्तानं छाया कदम पुन्हा एकदा जागतिक चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवणार आहे.