राजेंद्र मेघवार हे पाकिस्तान पोलीस सेवेत सामील होणारे पहिले हिंदू अधिकारी आहेत. ‘पाकिस्तान टुडे’ ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या फैसलाबादमध्ये त्यांची साहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी) म्हणून नियुक्ती झाली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना पाकिस्तानमधील एका हिंदू नेत्याने याचे महत्त्व अधोरेखित केले ते म्हणाले की, अल्पसंख्याक हिंदूंना देशात अनेकदा भेदभावाचा सामना करावा लागतो. मेघवार यांची पाकिस्तान पोलीस सेवेमधील (पीपीएस) नियुक्ती हिंदू समुदायाच्या समस्यांचे निराकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
कोण आहेत राजेंद्र मेघवार?
राजेंद्र मेघवार हे सिंध प्रांतातील बदीन या गावी राहतात. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या वंचित भागात राहूनही त्यांनी खूप मेहनत करून नागरी सेवा परीक्षा (सीएसएस) उत्तीर्ण केली आणि पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. मेघवार यांना आपल्या स्वप्नांची पूर्तता झाल्याचा खूप अभिमान वाटतो. फक्त हिंदू समाजाचं नाही तर पाकिस्तानमधील सर्व अल्पसंख्य गटांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांची सेवा करणे त्यांचे ध्येय आहे.
“पोलीस दलात राहिल्याने आपण लोकांच्या समस्या थेट सोडवू शकतो, हे आपण इतर विभागांमध्ये करू शकत नाही,” असे मेघवार यांनी ‘जिओ न्यूज’ला सांगितले.
इस्लामिक प्रजासत्ताक असलेला पाकिस्तान हा जगातील पाचवा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. 2023 च्या जनगणनेनुसार, इथे हिंदू हा सर्वांत मोठा अल्पसंख्याक गट आहे. पाकिस्तानच्या 24 कोटी लोकसंख्येपैकी 2 टक्के लोक हिंदू आहेत.
राजेंद्र मेघवार यांच्या नियुक्तीला पाकिस्तानी पोलिस दलाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पंजाब पोलिसांच्या स्थापनेनंतर फैसलाबादमध्ये इतक्या उच्च पदावर हिंदू अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. “आम्ही भाग्यवान आहोत हिंदू अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे पोलिस दलातील सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन मिळेल,” असे पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
पाकिस्तान हिंदू मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य कृष्ण शर्मा यांनी या नियुक्तीचे महत्त्व अधोरेखित केले आणि टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, देशाच्या पोलिस दलात हिंदू निरीक्षक आणि उपनिरीक्षक आहेत, मात्र वरिष्ठ अधिकारी नाहीत. “राजेंद्र मेघवार यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून, समाजाला त्यांचा अभिमान आहे,” असे शर्मा म्हणाले. त्यांच्या यशामुळे समाजातील तरुणांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
रूप मती मेघवार, पूजा ओड, सुनील मेघवार, जीवन रिबारी आणि भीष्म मेघवार या पाच हिंदू विद्यार्थ्यांनी पाकिस्तानमध्ये मोठ्या पदांसाठी असलेली सीएसएस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यातून ते प्रशासकीय आणि नोकरशाहीच्या क्षेत्रात काम करू शकतील. ‘पाकिस्तान टुडे’च्या वृत्तानुसार, रहीम यार खान येथील रहिवासी रूप मती यांचे परराष्ट्र मंत्रालयात काम करण्याचे ध्येय आहे. यावर कृष्ण शर्मा म्हणाले, “त्यांचे यश हे केवळ वैयक्तिक विजय नाही, तर प्रतिकूलतेच्या विरोधात दृढनिश्चयाचे एक उदाहरण आहे. मर्यादित संसाधने आणि सुविधा असूनही, या तरुण हिंदू विद्यार्थ्यांनी सिद्ध केलं आहे की, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतात.