जपानच्या जन्मदरामध्ये वर्षागणिक पाच टक्क्याने घट होत आहे. जर याच गतीने जन्मदर कमी कमी होत गेला तर, 695 वर्षांनी म्हणजे 2720 वर्षी जपानमध्ये केवळ एकाच बाळाचा जन्म होईल. हे वाचताना काल्पनिक वाटेल. मात्र, जपान मध्ये ज्यापद्धतीने जन्मदर घटत आहे. हे वास्तवात घडण्याची शक्यता आहे. आशिया खंडातील देशांच्या लोकसंख्येची माहिती अलीकडेच प्रदर्शित केली. या आकडेवारीनुसार सलग नवव्या वर्षी जपानचा जन्मदर सगळ्यात जास्त घसरत असल्याचं दिसून आलं आहे.
दक्षिण कोरियामध्ये जन्मदर वाढला
या रिपोर्टच्या दोन दिवसापूर्वीच दक्षिण कोरियाच्या जन्मदरासंदर्भातला रिपोर्ट समोर आला. दक्षिण कोरीयामध्येही घटता जन्मदर हा चिंतेचा विषय होता. मात्र, अलीकडच्या या रिपोर्टनुसार दक्षिण कोरीयामध्ये सलग नऊ वर्षांनंतर जन्मदरामध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आताचा वाढता जन्मदर पाहता, कोविड काळादरम्यान लग्न करणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे कदाचीत हा जन्मदर घटलेला असावा, असं अनुमान काढलं जात आहे.
दरम्यान, जपानच्या या घटत्या जन्मदरामागे मात्र असं कोणतंही कारण दिसून येत नसल्याचं अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे, कुटुंब नियोजनाच्या जपानच्या या धोरणाचा येत्या काही वर्षात जपानला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जपानमध्ये घटता जन्मदर
जपानच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी 2024 सालच्या लोकसंख्या आणि नवजात बालकांच्या जन्माची आकडेवारी सादर केली. त्यानुसार, जपानमध्ये 7 लाख 20 हजार 988 बालकांचा जन्म झाला. यामध्ये परदेशात असलेल्या जपानी वंशाच्या बाळांचाही समावेश आहे. 2023 सालच्या तुलनेत या जन्मदरामध्ये 5 टक्क्याने घट झाली आहे. 2023 साली जपानमध्ये 7 लाख 58 हजार 631 बाळांचा जन्म झाला होता. या तुलनेत , भारतात 2024 सालात 2 कोटी 94 लाख 66 हजार 366 बाळांचा जन्म झाला आहे. कंट्रीमीटर या वेबसाइटने याविषयी माहिती दिली आहे.
जपान सरकारने 1899 सालापासून जन्मदरासंदर्भातल्या माहितीची नोंद ठेवायला सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 2024 सालचा जन्मदर हा सगळ्यात कमी जन्मदर असल्याची नोंद करण्यात आली आहे.
हे ही वाचा : जनरेशन बीटा : शिक्षण घेण्याची नवी पद्धत, शाळा तयार आहेत का?
मृत्यूदरातही वाढ
एकीकडे जन्मदर घटत आहे तर दुसरीकडे मृत्यूदरामध्ये वाढ होत आहे. 2024 साली, जपानमध्ये 16 लाख 18 हजार 684 जणांचा मृत्यू झाला. 2023 च्या तुलनेत या मृत्यूदरात 1.8 टक्क्यांने वाढ झाली आहे. वर्षाला 7 लाख नवजात बालकं जन्माला येत आहेत तर दुसरीकडे 16 लाख नागरिकांचा मृत्यू होत आहे. या व्यस्त प्रमाणामुळे जपानची एकूण लोकसंख्या 9 लाखाने घटली आहे. थोडक्यात, एक बाळ जन्मला येतं त्याचवेळी दोन प्रौढ नागरिकांचा मृत्यू होतो, अशी परिस्थिती जपानमध्ये निर्माण झाली आहे.
नवदाम्पत्यांना मुलं का नकोत?
या सगळ्या वस्तुस्थितीवर पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते सांगतात की, जपानमध्ये लग्न करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत जन्मदर मात्र वाढत नाही आहे. या मुद्याला अनुसरुन कुठेतरी नव दाम्पत्यांना बाळ नको आहे का? की गर्भधारणेत वैद्यकीय किंवा अन्य अडचणी आहेत? या संदर्भातल्या वेगवेगळ्या मुद्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे.
जपानमध्ये जन्मदर घटण्याची कारणं काय?
जन्मदर घटण्याला अनेक कारणं असू शकतात. जपान रिसर्च इन्स्टिट्यूटमधल्या अर्थतज्ज्ञ ताकूमी फुजीनामी यांनी या विषयावर मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणतात की, इतर देशांप्रमाणेच 100 बालकांपैकी खूपच कमी बालके ही लग्न न झालेल्या दाम्पत्यांकडून जन्माला येतात. बहुसंख्य बालके ही वैवाहिक नात्यातूनच जन्मला येतात. यातून लग्न आणि नवबालकांचा जन्म यातलं बंध स्पष्ट होतो.
जपानमध्ये 2024 साली 4 लाख 99 हजार 999 लग्न झाली. 2023 च्या तुलनेत या प्रमाणात 2.2 टक्क्याची वाढ झाली होती. तर 2020 मध्ये जपानमध्ये नवीन लग्न नात्यांमध्ये 12.7 टक्क्याची घट झाली होती.
हे ही वाचा : नवीन पिढी ‘जनरेशन बीटा’ 2025
‘पक्की नोकरी नाही लग्न नाही’
सन 2020 मध्ये कोविड काळामध्ये लग्न करण्याच्या संख्येत घट झाली होती. मात्र, त्यानंतर लग्नसंख्येत हळूहळू वाढ होत आहे. लग्नाचं योग्य वय झाल्यावर लग्न का केलं जात नाही, याविषयी इकाटेरिना हरटॉग यांनी संशोधन केलं. त्यांनी जपानी तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आढळून आलं की, रोजगार हा महत्त्वाचा मुद्दा बनत आहे. ज्या तरुणांच्या हातात पक्की नोकरी नाही अशा मुलांशी लग्न करण्यास मुली ठाम नकार देत आहेत. जर पक्की नोकरी नसेल तर लग्न पुढे ढकलण्याचा किंवा ते पूर्ण रद्द करण्याचा निर्णय तरुण घेत आहेत. बऱ्याच मुलीसुध्दा आर्थिक परिस्थिती भक्कम नसल्यामुळे, चांगला पगार नसल्यामुळे लग्न करण्याचं टाळत आहेत. तर काही मुली या लग्न करत आहेत पण कुटुंब विस्तार म्हणजे मुलांना जन्म देण्यास नकार देत आहेत.
कारोशी कल्चर
जपानमध्ये स्थिर नोकऱ्यांचं प्रमाण कमी आहे. नोकरी असली तरी त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. यामुळे अनेक दाम्पत्य मुलांना जन्म देत नाहीत. याशिवाय आणखीन एक कारण आहे ते म्हणजे वर्क कल्चर.
जपानमध्ये ओवर वर्कचं म्हणजे अतीकाम करण्याची संस्कृती आहे. या कामाच्या अतीताणातून मृत्यूसुद्धा होतात, यालाच कारोशी असं म्हणतात. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून जपानमधली आताची लग्न झालेली दाम्पत्य ही कुटुंब विस्तारावर गांभीर्याने विचार करत नाहीत.
घटत्या जन्मदरावर जपान सरकारच्या उपाययोजना
गेल्या काही वर्षापासून जपानचा जन्मदर घटत आहे. 2023 साली तत्कालीन पंतप्रधान फूमियो किशिदा चिंता व्यक्त करताना बोलले होते की, जपानच्या घटत्या जन्मदरामुळे भविष्यात आपण समाज म्हणून कायम राहू की नाही अशा परिस्थितीत आहोत. जन्मदर वाढवण्यासाठी मुलं आणि बालसंगोपन या धोरणांवर विशेष लक्ष देण्यासाठी धोरणं राबवली जात आहेत.
तरुणांनी लग्न करावीत, मुलांना जन्म द्यावेत यासाठी योजना राबवल्या जात आहेत. यासाठी ‘स्टेट रन डेटिंग ॲप’ हे टोकियो मेट्रोपॉलिटन सरकारकडून चालवलं जायचं. या ॲपचं एलॉन मस्क यांनी देखील कौतुक केलं होतं.
याशिवाय नवजात बालकांना सांभाळण्यासाठी डे केअर सुविधा पुरवली जाते, नवीन घराच्या खरेदीसाठी अनुदान दिलं जातं. बाळांना सांभाळण्यासाठी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी यांनी तब्बल 3.6 येन डॉलर निधीची तरतूद केली आहे.
तरी, जपानमध्ये हा जन्मदर वर्षागणिक वाढण्यासाठी अवधी लागणार आहे. जर सरकारच्या या उपाययोजनांचा सकारात्मक फायदा झाला नाही आणि हा जन्मदर घटतच राहिला तर एक देश येत्या काही वर्षात नाहीसा होताना दिसून येईल.