राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी प्लास्टिक स्ट्रॉवरची बंदी हटवण्याच्या आदेशावर सही केली. ट्रम्प यांनी शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी सोशल मीडियावर याविषयी पोस्ट केली होती. त्यानंचर जगभरात त्यांच्या या निर्णयावर चर्चा सुरू झाली. तरी त्यांनी आपला निर्णय न बदलता, मंगळवारी या आदेशावर सही करत अमेरिकेमध्ये सरसकट रिसायकल प्लास्टिक स्ट्रॉ वापरण्यास परवानगी दिली आहे.
पृथ्वीतलावर प्लास्टिक प्रदुषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे आज अनेक देशांमध्ये प्लास्टिक वापरावर बंदी घातली जात आहे. अशावेळी अमेरिकेसारख्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने केवळ पेपर स्ट्रॉ वापरायला चांगला वाटत नाही, म्हणून प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेणं धक्कादायक मानलं जात आहे.
ट्रम्प हे आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्लास्टिक स्ट्रॉ संदर्भात घेतलेला निर्णय ‘हास्यास्पद’ आहे. प्लास्टिक प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी सन 2035 पर्यंत अमेरिकेतील सर्व सरकारी कार्यालयामध्ये सिंगल यूज प्लास्टिकचा वापर संपुष्टात आणण्याचा निर्णय बायडेन सरकारने घेतला होता. मात्र, कागदी स्ट्रॉ हा पर्याय व्यवहार्य नाही, म्हणून ‘बॅक टू प्लास्टिक’ असं म्हणत प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी उठवणार असल्याचं ट्रम्प यांनी सूचित केलं आहे.
काय होते माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे कार्यकारी आदेश
सन 2024 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्लास्टिक बंदी संदर्भात आदेश दिला होता. या आदेशानुसार, अमेरिकेतील सर्व सरकारी कार्यालयामध्ये सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. सन 2027 पर्यंत सर्व सरकारी कार्यालयातील प्लास्टिक वापर पूर्णत: बंद करण्याचं ध्येय ठेवलं होतं. तर 2035 पर्यंत संपूर्ण देशामध्ये सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करण्याचं उद्दीष्ट नजरेसमोर ठेवलं होतं. यामध्ये प्लास्टिक स्ट्रॉ, बॉटल्स, कप्स, प्लेट्स, स्वयंपाकघरात वापरात येणाऱ्या प्लास्टिक वस्तू, डब्बे, खाण्याच्या पदार्थांच्या पार्सलसाठी वापरात येणारे डब्बे, पिशव्या अशा सगळ्या प्लास्टिक वस्तूंचा समावेश होता.
प्लास्टिकवरुन डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक वाद
प्लास्टिक प्रदुषणावर आळा घालण्यासंदर्भात अमेरिकेमध्ये एकमुखी धोरण आढळून येत नाही. अमेरिकेमध्ये प्लास्टिकचा वापर खूप होतो. त्याला प्रतिबंध घालणं गरजेचं आहे. मात्र, अमेरिकेसारख्या विकसीत देशामध्ये यासंदर्भात ठोस धोरण नसणं हे आश्चर्यचकीत करणार आहे. अक्षरश: या प्लास्टिक वापरावरुन अमेरिकेमध्ये राजकीय प्रचार केला गेला आहे.
सन 2019 मध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राजकीय प्रचाराच्या वेबसाईटवरुन हजारो ब्रँडेड स्ट्रॉ विकले होते. या अभियानाला त्यांनी ‘लिब्ररल पेपर स्ट्रॉ’ ला पर्याय असं नाव दिलं होतं. हे स्ट्रॉ लाल रंगाचे असून त्याच्यावर ‘ट्रम्प’ हा शब्द कोरला होता. तेव्हा 10 स्ट्रॉची किंमत 15 डॉलर इतकी होती. त्यावेळी या स्ट्रॉचा खप वाढावा म्हणून “लिबरल स्ट्रॉ व्यवस्थित काम करत नाहीत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत उभे राहून रिसायकल स्ट्रॉ आजचं खरेदी करा” असं घोषवाक्य वापरलं होतं.
सन 2020 च्या प्रचाररॅलीत पुन्हा एकदा ट्रम्प यांनी डेमोक्रेटिक पक्षावर कागदी स्ट्रॉवरुन टीका केली होती. ते म्हणाले होते की, “ त्यांना (रिपब्लिक) प्लास्टिक स्ट्रॉवर बंदी घालायची आहे. पण कोणी ते कागदी स्ट्रॉ वापरुन पाहिले आहेत का? त्यातून तुम्ही काही प्यायलात की ते खराब व्हायला लागतात.” यावरुन जेथे सारं जग हे प्लास्टिक प्रदूषण आणि अन्य प्रदुषणाच्या विरोधात एकसमान धोरणं ठरवून त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेला अमेरिकेत या प्रदुषणाविरोधात एकसमान धोरणं नसणं, त्याउलट राजकारणासाठी त्याचा वापर करणं हे अनपेक्षित आहे.
अमेरिकेत प्लास्टिक स्ट्रॉवर बंदी घालणारे राज्य
ऑगस्ट 2015 मध्ये युट्यूबवर एका समुद्री कासवाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक सर्जन हे कासवाच्या नाकातून स्ट्रॉ बाहेर काढत असून त्यावेळी कासवाच्या नाकातून रक्त ओघळत असल्याचं दिसून येतं. या दृश्यामुळे सोशल मीडियावर प्लास्टिक स्ट्रॉवर बंदी घालण्याची चळवळ उभी राहिली. त्यानंतर अनेक देशांनी, संस्थांनी हा मुद्दा उचलून धरत एकूणच प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यासंदर्भातलं धोरण आखलं.
अमेरिका सरकारने प्लास्टिकवर बंदी घालण्यापूर्वी सन 2018 मध्ये तेथल्या सिॲटल शहरामध्ये प्लास्टिक वस्तूंच्या वापरावर पूर्ण बंदी घातली. त्यानंतर कॅलिफोर्निया, न्यू जर्सी, ओरिगॉन, रोहदे आयलँड, वॉशिंग्टन, वरमोंट या राज्यातही प्लास्टिक वस्तू वापरांवर बंदी घातली.
रिसायकल प्लास्टिक स्ट्रॉ खरंच प्रदूषण कमी होणार?
ट्रम्प यांच्या प्रचाराच्या वेबसाईटवरुन कागदी स्ट्रॉ ऐवजी प्लास्टिक रिसायकल स्ट्रॉ वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, हे रिसायल होणारे प्लास्टिक स्ट्रॉसुद्धा मुळात प्लास्टिक आहे त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण अगदीच किंचित कमी होतं; प्रदूषणाला पूर्ण आळा बसत नाही. त्यामुळे या निसर्गाचं पर्यायाने प्राण्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं.
हे रिसायकल प्लास्टिक स्ट्रॉ एका कालावधीपर्यंतच वापरता येतात. त्यानंतर ते जेव्हा कचरापेटीत फेकले जातात किंवा त्यांच्यावर विघटनाची प्रक्रिया केली जाते, तेव्हा त्यातील बारीक बारीक प्लास्टिकचे कण हे हवा, माती किंवा पाण्यामध्ये मिसळले जातात. हे प्लास्टिकचे छोटे कण आणि त्यातलं केमिकल हे पर्यावरणासह, पृथ्वीतलावरील सर्व सजिवांसाठी सुद्धा धोकादायक आहे.