आपल्या परिवारातल्या आणि देशातल्या ज्ञात आणि अज्ञात मृत व्यक्तिंचं स्मरण आपण पितृपक्षात करतो. ह्या मृत व्यक्ती पितृपक्षात पृथ्वीवर वास्तव्यास येतात असा समज आहे. जगातल्या सर्वच देशांमध्ये वर्षातून एकदा आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याची संस्कृती आहे. पाहुयात इतर देशांमध्ये पितरांचं स्मरण कशाप्रकारे करतात.
दिया दो फिनादोस
दोन नोव्हेंबरला पेरूमध्ये ‘दिया दे लाॅस म्युएर्तोज ‘ (Día de los Muertos ) (Day of the Dead) असतो. ब्राझीलमध्ये याला, ‘दिया दो फिनादोस ‘म्हणतात. पुर्वजांच्या आठवणीत या दिवशी काही धार्मिक विधी केले जातात. मेक्सिको, मध्य अमेरिका आणि ॲझटेक, मायान संस्कृतीतही या दिवसाला महत्वं आहे.
महिनाभर आधी सजावटीचं प्लानिंग
खरंतर मेक्सिकोत नोव्हेंबरमध्ये थंडीचं आगमन होतं. या दिवशी मोनार्क फुलपाखरू आलं की समजायचं आपल्या आप्तांचा आत्मा त्याच्या रूपाने जवळ आलाय. या दिवशी ऑफेर्तो किंवा ऑफरेन्दा खूप महत्त्वाचं असतं. आपण गणपतीमध्ये एका विशिष्ट जागी आरास करून मूर्ती स्थानापन्न करतो ना तसंच काहीसं हे आहे. इथं मूर्ती ऐवजी मृत व्यक्तीचा फोटो वगैरे असतो. कित्येक दिवस आधीपासून ऑफरेन्दामधील सजावटीसाठी प्लानिंग करण्यात येतं. मृत व्यक्तीला आवडणाऱ्या सजावटीच्या वस्तू, फोटो, खाद्यपदार्थ आणि पेयं ऑफरेन्दामध्ये ठेवले जातात. या सर्व आवडीच्या गोष्टींचा आस्वाद घ्यायला मृत व्यक्तीचा आत्मा तिथं येणारचं अशी ब्राझीलमधील लोकांची खात्री असते.
मानवी सापळ्यांच्या डिझाईनचे कपडे
मृतांच्या आठवणीत त्यांच्या फोटोजवळ पाण्याचं भांडं, खास साॅफ्ट पाव ‘पान दे म्युएर्तो’ ठेवतात. या दिवशी हाडांचा सापळ्याचे डिझाईन असलेले कपडे घालून लहान-मोठे सर्वच मिरवतात. मृत्यू हा एक दिवस सर्वांनाच येणार आहे. त्यामुळं मृत्यूचा स्वीकार सकारात्मकतेनं करण्याचा विचार अशाप्रकारे मानवी सापळ्याचे चित्र असणारे कपडे घालण्यामागे असतो. हे कपडे वेगवेगळ्या स्टाईलचे असतात. मानवी कवटीचे विविध मास्कही जिकडे तिकडे पाहायला मिळतात. अगदी लहान मुलांची खेळणीही. गिटार वाजवणारा सापळा, आंघोळ करणारा अगदी टॉर्टिला बनवणारा सापळाही पाहायला मिळतो. काहीजण कुत्र्याच्या हाडाचे कपडेही घालतात. याचं कारण म्हणजे आत्म्याच्या मुक्तीसाठी स्वर्गाच्या दारी कुत्रा शेवटपर्यंतच्या प्रवासात साथ देतो. हे असे कपडे घालून आणि खेळणी घेऊन वाजत-गाजत मोठ्या मिरवणुका निघतात. त्यात मानवी सापळ्यांचे 8-10 फूट उंचीचे पुतळेही असतात.
दफनभूमीत पार्टी आणि ओळखपरेड
मेक्सिकोमध्ये १ आणि २ नोव्हेंबरला डे ऑफ द डेड साजरा करण्यात येतो. हे दिवस एखाद्या सणासारखे सेलिब्रेट करण्यात येतात. आपल्या आप्तांच्या आत्मांच्या स्वागताकरता मेक्सिकोच्या विविध भागात वेगवेगळ्या परंपरा आहेत. ग्रेव्ह यार्डमधल्या थडग्यांना फुलांनी सजवतात. या दिवशीच्या सजावटीत स्थानिक झेंडूच्या फुलांना विशेष मान आहे. कबरीवर व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ मांडून ठेवतात. मृत व्यक्तींच्या आवडीचे वाद्य, पुस्तकंही इथं मांडतात. काही समुदायांत घरीच ऑफरेन्दाची सजावट करतात. त्याला इथं आल्टरही म्हणतात. घराच्या मुख्य प्रवेशदारापासून ते ऑफरेन्दापर्यंत मेणबत्त्या पेटवतात. जेणेकरून मृतात्म्यांना घरापर्यंत वाट सापडायला सोपं होईल. ज्यांच्या घरी आल्टर ठेवतात ते घरातला कार्यक्रम आटपला की, दफनभूमीकडं जातात. दफनभूमीतील कबर सजवलेली असतेच. गंमत म्हणजे दफनभूमीतच छान मेजवानीचं आयोजन केलेलं असतं. आपल्या पूर्वजांसोबत गप्पा मारत हे खास जेवण सर्वजण चांगलंच एंजॉय करतात. घरातल्या नवीन सदस्य आणि बाळांचा परिचय पूर्वजांना करून देतात.
युरोपात मात्र हा दिवस शांतपणे मृतात्मे आणि संतांच्या आठवणीत पाळला जातो. इथंही दफनभूमीत जाऊन कबरी स्वच्छ करून मेणबत्त्या पेटवून फुलं वाहण्यात येतात.
एकंदरीत ब्राझील आणि मेक्सिकोत ‘पितृदिवस’ सर्व कुटुंबीय एकत्र येऊन खूप आनंदात आणि उत्साहात साजरा करतात.