गोवा म्हणजे सुंदर समुद्रकिनारे, रंगीबेरंगी फेस्टिव्हल्स. ख्रिसमसच्या काळात गोव्यात घराघरात खास पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. गोव्यातील कॅथलिक घरांमध्ये ख्रिसमसकरता तयार केले जाणारे पदार्थ इतर भागात आढळत नाहीत. या पदार्थांची नावंही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कलकल, दोदोल, बेबिंका, दोस यांची चवही अफलातून असते. मुख्यतः तांदूळ, नारळ, माडाचा गूळ आणि अंडी यांचा वापर यात करतात.
दोदोल
दोदोल हा तांदळाच्या किंवा नाचणीच्या पिठापासून बनवलेला पौष्टिक पदार्थ आहे. खरंतर, माडाचा गूळ आणि खोबऱ्याचं तेल यांमुळे या पदार्थाला वेगळीच खास चव येते. नारळाच्या दुधात नाचणीचे किंवा तांदळाचे पीठ, माडाचा गूळ किंवा साखर, तूप, काजू-बदाम घालून तो तयार केला जातो. त्यानंतर याच्या छान वड्या पाडल्या जातात. दोदोल हा पदार्थ मऊसूत असतो.
बिबिंका
बिबिंका हा इंडो-पोर्तुगीज प्रकारात मोडणारा पुडींग किंवा पेस्ट्रीचा प्रकार आहे. गोव्यात आणि गोव्याला भेट देणाऱ्या लोकांमध्येही बिबिंका खूप लोकप्रिय आहे. दोन रंगाचे थर आलटून पालटून एकावर एक रचले जातात. बिबिंका तयार करताना खूप पेशन्स ठेवणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक थर बेक करून त्याला एकावर एक ठेवले जाते. नारळाच्या दुधात साखर, मैदा, अंडी, जायफळ, वेलची पावडर घालून हे पुडींग बनवले जाते. त्यानंतर याचे थर एकावर एक ठेवले जातात. खूप मेहनतीनंतर तयार झालेला हा बिबिंका गोवन ख्रिश्चन समुदायाचा पारंपरिक मिष्टान्नाचा प्रकार आहे.
कलकल
कलकल हा थोडा फार शंकरपाळ्यांसारखा प्रकार आहे. त्याचा आकारही खूप आकर्षक असतो. हा पदार्थ बनवण्यासाठी मैदा, रवा, साखर, बटर, दूध, तूप, अंडी, बदाम, व्हॅनिला इसेन्स हे साहित्य लागतं. सर्व साहित्य एकत्र करून मऊ गोळा मळण्यात येतो. त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्यांना छोट्या शंखाचा आकार देण्यात येतो. हे दिसायला खूप आकर्षक असतात. त्या लहान शंखांना कढईत तेलात तळण्यात येते. कलकल तळून झाल्यावर त्यावर हलक्या हाताने पिठी साखर भुरभुरली जाते. खूप कमी वेळात या चविष्ट कुकीज बनतात.
दोस
चण्याच्या डाळीपासून बनवलेली एक पारंपरिक गोवन मिठाई म्हणजे दोस वड्या. चण्याची डाळ थोडा वेळ पाण्यात भिजवून मग ती प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यायची. ही डाळ नरम मऊ करून घ्यायची. या डाळीत खोवलेला नारळ, साखर, वेलदोड्याची पूड आणि मीठ घालून ते मंद आचेवर आटवण्यात येते. त्यानंतर हे मिश्रण केळ्याच्या पानावर पसरून थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडतात. यामध्ये सुका मेवाही घालू शकतो. याने त्याची चव अजून चांगली लागते. दोस खूप मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट असतो.