9 डिसेंबर 2024 ला रशियाच्या कॅलिनिंग्रॅड येथील यंतार शिपयार्डमध्ये भारतीय नौदलाच्या आयएनएस तुशील युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले.भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या युद्धनौकेचे जलावतरण झाले. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “ही युद्धनौका भारताच्या वाढत्या सागरी शक्तीचे ‘गौरवशाली प्रतीक’ आणि भारत-रशिया यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीतील एक ‘महत्त्वाचा टप्पा’ आहे”.
INS तुषिल : खास का आहे?
भारताची नौदल शक्ती वाढवण्यासोबत INS तुषिलमध्ये काही खास आहे. या जहाजाचे इंजिन युक्रेनमध्ये बनवले गेले आहे. हे काम रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असताना झालं आहे..
INS तुषिल
‘तुषिल’ या संस्कृत शब्दचा अर्थ आहे ‘संरक्षण कवच’. रशियाच्या प्रोजेक्ट 11356 अंतर्गत ही अत्याधुनिक युद्धनौका तयार करण्यात आली आहे. भारतात आल्यानंतर ही युद्धनौका लगेचच नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. भारतीय नौदलाच्या मते, यात वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान जगातील सर्वात प्रगत फ्रिगेट्सपैकी एक आहे.
या युद्धनौकेचे बांधकाम 12 जुलै 2013 रोजी सुरू झाले होते आणि ऑक्टोबर 2021 मध्ये ती पाण्यात उतरली. 25 जानेवारी 2024 रोजी या युद्धनौकेची पहिल्या समुद्री चाचणी घेतली. त्यानंतर फॅक्टरी चाचण्या, स्टेट कमिटी चाचण्या आणि शेवटी डिलिव्हरी स्वीकृती चाचण्या (बंदर आणि समुद्रात) पूर्ण केल्या. या सर्व चाचण्या 24 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण झाल्या. या जहाजाने सर्व रशियन शस्त्र प्रणालींच्या यशस्वी फायरिंग चाचण्या केल्या असून लवकरच ती संपूर्ण सज्ज स्थितीत भारतात पोहोचेल.
रशियाने भारतीय नौदलासाठी डिझाईन आणि बांधलेल्या तालवार-क्लास फ्रिगेट्सला प्रोजेक्ट 11356 म्हणतात. या जहाजाचे डिझाईन रशिया वापरत असलेल्या अॅडमिरल ग्रिगोरोविच-क्लास फ्रिगेट्सपेक्षा अधिक प्रगत आहे. आतापर्यंत, अशी सहा जहाजे बांधली गेली आहेत. 1999 आणि 2013 दरम्यान रशियाने ही जहाजे भारताला दिली आहेत.
रशियाच्या जहाज बांधणी कंपनीच्या डायरेक्टर-जनरल अलेक्सी राखमानोव यांनी सांगितल्याप्रमाणे, काही सुट्या भागांच्या पुवठ्याला उशीर झाल्याने फ्रिगेटच्या बांधकामाला विलंब झाला. जहाजाची डिलिव्हरी 2022 च्या शेवटी होण्याची अपेक्षा होती, परंतु त्यात विलंब झाला. 2016 च्या ऑक्टोबरमध्ये रशियन सरकारी कंपनी रोसोबोरोनएक्सपोर्ट, भारतीय नौदल आणि भारत सरकार यांच्यात या जहाजाच्या खरेदीसाठी करार झाला होता.
INS तुषिल जहाजाच्या डिलिव्हरीला उशीर झाला कारण या जहाजासाठी आवश्यक असलेले इंजिन युक्रेनमधून येणार होते. INS तुषिल हे एक क्रिवॅक फ्रिगेट आहे आणि ते युक्रेनच्या Zorya Mashproekt कंपनीच्या इंजिनने चालते. ही कंपनी सागरी गॅस टर्बाइन तयार करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
भारतीय नौदलातील सुमारे 30 जहाजे युक्रेनियन कंपनीच्या गॅस टर्बाइनवर चालतात. यात वीर वर्ग मिसाईल बोट्सपासून ते जुने राजपूत वर्ग विध्वंसक आणि नवीन विशाखापट्टनम वर्ग विध्वंसक यांचा समावेश आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, कीवने मास्कोच्या सर्व उत्पादनांचा पुरवठा थांबवला. त्यामुळे जहाज बांधकाम थांबले. भारताने युक्रेनियन कंपनीसोबत एक करार केला. या करारानुसार, दिल्ली सरकार थेट इंजिन खरेदी करेल आणि नंतर ते रशियातील जहाज बांधणी यार्डमध्ये पोहोचवेल.
INS तुषिल भारतीय नौदलासाठी गेम-चेंजर
125 मीटर लांब आणि 3,900 टन वजनाच्या INS तुषिलमध्ये खूप शक्ती आहे आणि हे रशियन आणि भारतीय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आणि युद्धनौका बांधणीतील सर्वोत्तम पद्धतींचे उत्तम एकत्रीकरण आहे. या तुलनेनं बघायला गेलं तर, सध्या नौदलाची सर्वात मोठी विनाशिका असलेली INS कोलकाता फक्त 163 मीटर लांब आहे आणि त्याचे वजन 7,500 टन आहे. यात 30 नॉट्सपेक्षा जास्त वेग गाठण्याची क्षमताही आहे.
डिफेन्स एक्सपर्टच्या मते, हे जहाज अपग्रेडेड कमोव 28 आणि कमोव 31 या अँटी-सबमरीन आणि एअरबोर्न अर्ली वॉर्निंग हेलिकॉप्टर्सनाही उतरवू शकते.
INS तुषिल भारताला हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या सैन्य शक्तीचा मुकाबला करण्यास मदत करेल. काही तज्ञांनी सांगितले आहे की, चीनी नौदल जगातील सर्वात वेगाने वाढणारे नौदल आहे आणि कदाचित केवळ शक्तीच्या जोरावर ते अमेरिकन नौदलापेक्षा पुढे गेले असावेत.