भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे 22 वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ ग्रहण केली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस सर्वात तरुण महापौर
भारतीय जनता पार्टीच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरूवात केली. सन 1992 साली देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय जीवनात पदार्पण केलं. वयाच्या 22व्या वर्षी फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली. ते नगरसेवक पदी निवडून आले. 1997 साली म्हणजे वयाच्या 27व्या वर्षी ते पुन्हा नगरसेवकपदी निवडून आल्यावर त्यांची महापौरपदी नियुक्ती करण्यात आली. तरुण वयात महापौरपदी नियुक्त होणारे फडणवीस हे देशातले दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. तर नागपूरचे सगळ्यात पहिले तरुण महापौर होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.
राज्याच्या राजकारणात प्रवेश
सन 1999 साली देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघांतून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर सलग सहा वेळा ते या मतदारसंघांचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राज्याच्या राजकारणात प्रवेश केल्यावर तरुण नेते असूनही भाजपा पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. त्या त्यांनी लीलयाने पार पाडत राज्याच्या राजकीय पातळीवर अल्पावधीतच आपली छाप पाडली.
फडणवीस यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत अनेक संविधानिक पदाची जबाबदारी सोपवली होती.
2014 साली राज्यात विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. वयाच्या 44 व्या वर्षी ते मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले.
सन 2019 सालच्या विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या साहाय्याने भाजपा 105 आमदारांसह राज्यातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. पण राजकीय गणितं फिसकटली. या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र हे सरकार केवळ 80 तासापुरता टिकलं. हे सरकार, राज्यातलंच नव्हे तर, देशातलं सर्वात अल्पावधी सरकार ठरलं.
शिवसेना पक्षाने महायुतीतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं.
महाराष्ट्र विधानपरिषदा निवडणुकांनंतर राज्यात पुन्हा उलथापालथ झाली. जुलै 2022 मध्ये, भाजपाने शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटासोबत भाजपाने पुन्हा सत्ता स्थापन केली. मात्र, यावेळेस भाजपा पक्षाच्या नेत्तृत्वाने, देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली.
पक्षांतर्गत कारकीर्द
फडणवीस यांनी पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणीसाठी उत्तम कार्य केलं आहे. त्यांनी पक्षाच्या प्रभाग संयोजक पदापासून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. केरळ राज्याचे प्रभारी पदावर काम केलं आहे. केरळ,बिहार आणि गोवा राज्यातील 2020 -2021 विधानसभा निवडणुकीत ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून ते भूमिका पार पाडत असतात.
रेकॉर्डब्रेक विजय
सन 2012 साली भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यांच्या नेतृत्त्वात भाजपाने तीन लोकसभा आणि तीन विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. 2014 साली राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 122 जागा जिंकल्या. 2019 मध्ये भाजपाला 105 जागा मिळाल्या. तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 132 जागांसह अभूतपूर्व यश मिळवत त्यांचं नेतृत्व पुन्हा सिद्ध केलं.