केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत सोशल मीडियावरील 28,079 वेबसाईट लिंक्स (URLs) ब्लॉक केल्या आहेत. यामध्ये खलिस्तान समर्थक आणि फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्सचा समावेश आहे. ही कारवाई माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69(अ) अंतर्गत करण्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारनं एकूण 28,079 URLs ब्लॉक केल्या आहेत. यामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सर्वाधिक ब्लॉक केलेल्या लिंक्स या एकूण 10,976 फेसबुक वरील तर 10,139 ट्विटरच्या होत्या. यामधील फेसबुकवरील अनेक लिंक्स या फसवणूक योजनांशी संबंधित होत्या. याशिवाय, 2211 यूट्यूब चॅनेल , 2198 इंस्टाग्राम अकाउंट्स , 225 टेलिग्राम चॅनेल्स आणि 138 व्हॉट्सॲप ग्रुप्स देखील ब्लॉक करण्यात आले आहेत.
त्यानुसार, 2022 मध्ये 6,775 अकाउंट्स , 2023 मध्ये 12,483 अकाउंट्स आणि 2024 मध्ये 8829 सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक झाले आहेत.
केंद्र सरकारने या लिंक्स गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिफारसशींवरून ब्लॉक केल्या आहेत. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले की, काही साइट्स आणि ॲप्सवर भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारा कंटेंट असल्याने, सरकारने त्या बंद केल्या.
यामधील काही ब्लॉक केलेल्या लिंक्स वापरकर्त्यांना थर्ड पार्टी वेबसाइट्स किंवा ॲप्सकडे वळवण्याचे काम करत होत्या, यामुळे अनेकांना फसवणुकीला सामोरे जावे लागले. यामध्ये वर्क फ्रॉम होम,गुंतवणूक आणि व्यापार अशा फसवणूक योजनांचा समावेश होता.
सरकारने केलेली ही कारवाई सोशल मीडियावरील धोके कमी करण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे.