जपानमध्ये पर्यटकाचा ओघ वाढावा यासाठी जपान एअरलाइन्सने काही निवडक देशांतल्या पर्यटकांसाठी मोफत प्रवासाची स्पेशल ऑफर सुरू केली आहे.
भारत, अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, थायलंड, सिंगापूर, न्यूजीलंड, ऑस्ट्रेलिया, विएतनाम, फिलीपिन्स, इंडोनेशिया, गांसू या देशांना तसेच चीनमधल्या बीजिंग, शांघाय, तियानजिन या शहरांना आणि तैवानची राजधानी ताइपे शहरातील पर्यटकांसाठी जपान एअरलाईन्सने ही खास ऑफर दिली आहे.
आंतरराष्ट्रीय तिकीटासोबत डोमेस्टिक फ्लाइट फ्री
अनेकदा आपण परदेशात फिरायला जातो तेव्हा तिथल्या प्रमुख शहरांमध्ये विमानाने पोहोचल्यावर त्या प्रमुख शहरातील पर्यटन स्थळांनाच भेटी देतो. त्या देशातल्या सगळ्यांच ठिकाणांना आपण काही भेट देत नाही. याला अनेक कारणं आहेत. जसं की, एकतर ही पर्यटन स्थळं वेगवेगळ्या राज्यात असतात. परदेशात देशांतर्गत प्रवास करताना विमान प्रवासाचा खर्च परवडत नाही. रेल्वे किंवा बस प्रवासामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे पर्यायी आपण परदेशातल्या ठरावीक शहरातल्याच पर्यटन स्थळांना भेट देतो. हे बदलण्यासाठीच जपान एअरलाईन्सने आंतरराष्ट्रीय विमानासोबत जपानमधली डोमेस्टिक फ्लाइटचं तिकीट मोफत देण्याची ऑफर सुरू केली आहे.
जेणेकरुन प्रवासी जपानमधल्या कोणत्याही मुख्य शहरात आल्यावर टू- टायर किंवा थ्री टायर शहरामध्ये सुद्धा फिरायला जाऊन तेथील पर्यटन स्थळांना भेटी देऊ शकतात.
या ऑफरचा फायदा कसा घ्याल?
या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एकाच वेळी दोन्ही तिकीटं बुक करावी लागणार आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही जपान मध्ये जायला आंतरराष्ट्रीय विमानाचं तिकीट बुक कराल तेव्हाच जपानमधल्या दुसऱ्या शहरात जाण्यासाठीचं डोमेस्टिक विमानाचं तिकीट तुम्हाला बुक करायचं आहे. दोन्ही तिकीट एकाच वेळी बुक केली तरच तुम्हाला ही ऑफर लागू होणार आहे.
जपानमध्ये पर्यटनाचं पेव
कोविड काळानंतर जपानमध्ये पर्यटन क्षेत्राचा विस्तार करुन त्यातून उत्पन्न मिळवण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्यासाठी पर्यटन स्थळांचा विकास करणे, सार्वजनिक वाहतुकी विकसीत करणे, व्हिसा प्रक्रिया सुलभ करणे, त्यातील नियमांत सुधारणा करणे असे अनेक पर्यटकांच्या अनुषगांने बदल केले आहेत.