महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभेत कोणते उमेदवार विधीमंडळाची पायरी चढणार, कोणतं सरकार सत्तेत असणार आणि कोण विरोधात हे सगळं आता मतपेटीत बंद झालं आहे.
राज्यात 58.22 टक्के मतदान झालं आहे. राज्यात सर्वात जास्त मतदान हे गडचिरोली जिल्ह्यात झालं आहे. गडचिरोलीमध्ये 69.63 टक्के मतदान झालं, तर मुंबईत सर्वात कमी 49.07 टक्के मतदान झालं.
निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नानाविध उपक्रम राबवले गेले. मतदान केंद्रांची संख्याही वाढवली गेली. अनेक मोठ-मोठ्या गृहसंकुलांमध्ये मतदान केंद्र उभारले. तरिही मतदारांनी मात्र मतदान करण्याकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट दिसून येतं.
तर झारखंड विधानसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात 67.59 टक्के मतदान झालं आहे.
मतदानाच्या आदल्या दिवसापासून सुरु झालेला राजकिय आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. मतदान करुन आल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देत या आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरुच ठेवत आहेत.
बीटकॉइन स्कॅम
मंगळवार मध्यरात्रीपासून समाजमाध्यमांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बीटकॉइन व्यवहारा संदर्भातली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या घटनेचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर ही पडले असून या सगळ्या भ्रष्टाचाराबाबत चौकशीची मागणी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. तर भाजपाने हे सगळं षडयंत्र रचलं असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे.
बारामतीत दमदाटी
बारामतीमध्ये मतदारांना दमदाटी करुन मतदान करायला लावत असल्याचा आरोप उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आहे. यांसदर्भात पोलिसांकडे तक्रार नोंदवल्याची माहिती ही त्यांनी दिली. याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे. शर्मिला पवार हे धांदात थोटे आरोप करत आहेत. आजवर एवढ्या निवडणूका झाल्या आमच्या कार्यकर्त्यांनी असं वर्तन कधीच केलं नाही. निवडणुकीपूर्वी उमेदवार वोटर स्लीप देतात. मतदान करायला जाताना बूथवर स्लीपवर असलेल्या उमेदवाराचा फोटो आणि पक्षाचं चिन्ह हे फाडून देतात. हे नेहमीचीची पद्धत आहे. यात काही वेगळं नाही. असं म्हणत त्यांनी हे आरोप खोडून काढले आहेत.
नाशिक येथे उमेदवारांमध्ये बाचाबाची
नाशिकमध्ये सुहास कांदे हे शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत तर समीर भुजबळ हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. आज दुपारी नांदगाव-मनमाड रस्त्यावर सुहास कांदे यांच्या गुरुकुल शैक्षणिक संस्थेच्या आवारात हजारो लोकांच्या जमावाला पैसे, जेवण वाटत असल्याचं भुजबळांच्या निदर्शनास आलं. त्यांनी पोलिसांनी फोन करुन याची माहिती दिली. पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही अशी माहिती भुजबळ यांनी दिली. पुढे सुहास कांदे यांनी समिर भुजबळ यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी देत होते. मात्र पोलिस हा सगळा प्रकार निमूटपणे बघत उभे असल्याचा आरोप समिर भुजबळ यांनी केला आहे.
तांत्रिक बिघाड
धुळे शहरात साक्री येथील जामदा आणि विद्यावर्धिनी येथील मतरांचा काही काळासाठी खोळंबा झाला. प्रशासनाने त्वरीत यंत्र बदलत मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू केली.
नांदगाव मतदारसंघातील 164 नंबर मतदान केंद्रावरील यंत्र दोन वेळेला बंद पडले.
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत बूथ क्रमांक 292 येथील मशीन बंद असल्याने मतदान प्रक्रिया थांबली होती. सकाळी 7 पासून मशीन इन्व्हॅलिड दाखवत असल्याने मतदान प्रक्रिया उशिराने सुरु झाली.
मतदानावर बहिष्कार
कन्नड तालुक्यातील रामनगर गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर शुकशुकाट पसरला आहे. गावात पायभूत सुविधा नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.