14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
पालघर जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या : 388
पालघर जिल्ह्यात डहाणु मतदारसंघांचं कम्यूनिस्ट पार्टी मार्क्सवादीचे आमदार विनोद निकोले यांनी सगळ्यात जास्त प्रश्न विचारले आहेत. या आदिवासी बहुल जिल्ह्यातून सगळ्यात जास्त प्रश्न सुद्धा आदिवासी बांधवांशी निगडीत विषयावरील उपस्थित केले आहेत.
तसेच राज्यातील टोल वसुलीसंदर्भात निश्चित धोरण ठरवण्याबाबत आणि राज्यातील कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्याकरीता धोरण निश्चित करण्याबाबतचे प्रश्न ही सभागृहात मांडले गेले.
पालघर जिल्हयातील अनधिकृत शाळांबाबत, पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा इमारतीची दुरावस्था, महिला सुरक्षा, शिक्षण या विषयासंदर्भातली प्रश्न सभागृहात उपस्थित केले.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | हितेंद्र विष्णू ठाकूर | बहुजन विकास आघाडी | वसई | 127 |
2 | क्षितीज हितेंद्र ठाकूर | बहुजन विकास आघाडी | नालासोपारा | 122 |
3 | राजेश रघुनाथ पाटील | बहुजन विकास आघाडी | बोईसर (अ.ज.) | 75 |
4 | श्रीनिवास चिंतामण वनगा | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | पालघर (अ.ज.) | 92 |
5 | सुनिल चंद्रकांत भुसारा | राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून शरद पवार गट | विक्रमगड (अ.ज.) | 70 |
6 | विनोद भिवा निकोले | कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) | डहाणू (अ.ज.) | 237 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत पालघर जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- मोखाडा तालुक्यातील सावर्डे या आदिवासीबहुल गावातील दोन कुपोषित बालकांचा योग्य उपचाराअभावी झालेला मृत्यू
- पालघर जिल्ह्यात युरिया खताचा होत असलेला काळाबाजार
- बोईसर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमधून अवैधरित्या खाडीत सोडण्यात येणारा रासायनिक सांडपाणी
- पालघर जिल्ह्यातील तारापूर एम. आय. डी. सी. मधील बजाज हेल्थ केअर कंपनीतील रासायनिक सांडपाणी भूमिगत पाईपलाईनद्वारे सार्वजनिक गटारात सोडल्याची घटना
- तलासरी तालुक्यातील सूत्रकार-वेळूगाव राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे बाधित होणाऱ्या लोकांना नुकसान भरपाई न मिळाल्याबाबत,
- पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई – बडोदा सुपरफास्ट हायवेच्या कामासाठी सुरु असलेल्या जमीन भूसंपादनात आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याबाबत,
- 10 फेब्रुवारी 2023 रोजी मनोर, येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवेच्या अपुऱ्या सोयी-सुविधांअभावी आदिवासी गरोदर मातेचा बाळासह मृत्यू झाल्याची घटना सभागृहाच्या निदर्शनास आणली
- पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील आदिवासींना वनपट्टयांचे हक्क मिळण्याबाबत
- धानिवरी येथील आदिवासी कुटुंबांना मोबदला न देता जमीन संपादित केल्याबाबत
- वाडा व विक्रमगड तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या बंधाऱ्यांच्या कामकाजाबाबतचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले.