आपली मैत्रीच आपल्या जिवावर उठेल याची संजयला (नाव बदलले आहे.) अजिबातच कल्पना नव्हती. रुचीशी आधी ऑनलाईन मैत्री झाली. दोघेही पंचविशीचे. मग तो प्रेमात पडला. तिनेही तिच्या प्रेमाची कबुली दिली आणि मग दिवस रात्र दोघांचा वेळ चॅटिंगमध्ये जायला लागला. दोघं दोन वेगळ्या गावात. लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप. एकमेकांविषयी ओढ, आकर्षण आणि सगळंच. रोजच्या भेटी शक्य नसल्याने सेक्सटिंग सुरु झालं. ऑनलाईन सेक्स टॉईजची खरेदी झाली. त्याची अँप्स वापरुन एकमेकांना लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्येही सुखावणं सुरु झालं. एकमेकांना न्यूड्स पाठवणं, स्वतःच्या सेक्सी क्लिप्स पाठवणं सगळंच सुरु होतं. नात्याचा हा रोमँटिक काळ काही दिवस सुरु होता. आणि एक दिवस रुचीने त्यांच्या सेक्सटिंगचे आणि न्यूड्सचे स्क्रीन शॉट्स शेअर करत ब्लॅकमेलिंगला सुरुवात केली. पैसे दिले नाही तर स्क्रीन शॉट्स व्हायरल करण्याची धमकी दिली. संजय घाबरला. रुची अधिक अधिक आक्रमक होत गेली आणि आपली बदनामी होईल या भीतीने संजयने एक दिवस आत्महत्या केली. काही वर्षांपूर्वी अशाच ऑनलाईन प्रेमातून पुण्यात दोन तरुणांनी काही दिवसांच्या अंतराने आत्महत्या केल्या होत्या. या दोघा तरुणांचा एकमेकांशी कसलाही संबंध नसला तरीही संजय प्रमाणेच त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र एकच होतं.
ते म्हणजे सेक्सटॉर्शन.
सेक्सटॉर्शनमध्ये विविध प्रकार मोडतात. पण सगळ्यात एक धागा सारखा असतो तो म्हणजे लैंगिक संबंध किंवा प्रेमाची नाती. व्हिडीओ कॉलिंगचा प्रकार गेल्या काही वर्षात सर्रास बोकाळला आहे. व्हॉट्सअप किंवा फेसबुक मेसेंजरवरुन अनोळखी नंबरवरुन एक व्हिडीओ कॉल येतो. व्हिडीओ कॉल जर उचलला गेला तर समोर एक मुलगी किंवा मुलगा असते. समोरची व्यक्ती नग्न किंवा अर्धनग्न अवस्थेत असते. कॉल उचलून बंद होईपर्यंतचा जो काही वेळ असेल त्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग गुन्हेगारांकडून केलं जातं आणि त्या रेकॉर्डिंगचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो. अशा प्रकारच्या सेक्सटॉर्शनच्या केसेस प्रचंड प्रमाणात वाढत आहेत.
2022 या वर्षभरात एकट्या पुण्यामधून1445 सेक्सटॉर्शनच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. या ‘नोंदवल्या’ गेलेल्या केसेस आहेत. याच्या पाचपट तरी केसेस प्रत्यक्षात घडत असतील असा अंदाज बांधला जातो. सेक्सटॉर्शनच्या घटना कुणाही बरोबर घडू शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्याबरोबर असं काहीही होऊ नये, यासाठी काळजी घेत सजग राहिलं पाहिजे.
याबाबत कायदा काय सांगतो?
तक्रार दाखल न होण्यामागे अनेकदा पीडित व्यक्तीची भीतीच असते. नसत्या पोलिसी लफड्यात अडकू ही भीती आणि अस्वस्थता सुद्धा असते. अशावेळी कायदा काय सांगतो हेही समजून घेतलं पाहिजे.
दोन प्रौढांमधील संमतीने झालेला सेक्स चॅट हा कायद्याने गुन्हा नाही. पण त्याचे व्हिडीओ किंवा ते मेसेज जर शेअर केले गेले तर लैंगिक छळासाठी भारतीय दंड संहिता 1860 (IPC) च्या कलम 354 अ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 67 (अश्लील सामुग्री ऑनलाईन प्रसारित करणे)अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. त्या मेसेज आणि व्हिडीओचा गैरवापर करून धमकावले किंवा खंडणी मागितली गेली किंवा अब्रू नुकसानीची धमकी दिली तर हा सुद्धा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीने अजिबात घाबरण्याचे कारण नाही. कायदा त्याच्याच बाजूने आहे. ह्या प्रकारच्या गुन्ह्यांना सेक्सटॉर्शन किंवा रिव्हेंज पॉर्न असे म्हटले जाते. ह्या पद्धतीचे गुन्हे प्रेमातून कटुता आलेल्या नात्यात, डेटिंग अँप्सवर, हनी ट्रॅप्ससाठी आलेल्या व्हिडीओ कॉल्समधून घडू शकतात. अशावेळी फोन नंबर, जर काही चॅटिंग झालं असेल तर त्याचे स्क्रीनशॉट्स, खंडणी मागणीचे चॅट्स, कॉल रेकॉर्डस् आदी गोष्टी पुरावा म्हणून वापरता येतात. त्यामुळे घाबरून हे पुरावे डिलीट करू नयेत. तक्रार 1930 या नंबरवर किंवा Cybercrime.gov.in या पोर्टलवरही तक्रार नोंदवता येऊ शकते किंवा जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवता येऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या बाबतीतल्या सेक्शुअलइज्ड कन्टेन्टविषयी तक्रार समाज माध्यमांकडे केली तर अपलोड झालेला तो कन्टेन्ट काढून टाकणे समाज माध्यमांसाठी बंधनकारक आहे हेही लक्षात घेणं आवश्यक आहे.
काय काळजी घ्यावी?
- कुठलाही अनोळखी व्हिडीओ कॉल उचलू नका, उचललाच समजा तरी बोट मोबाईलच्या कॅमेऱ्यावर ठेवा म्हणजे तुमचा चेहरा रेकॉर्ड होणार नाही.
- समोर जी नग्न बाई किंवा पुरुष असतो तो बऱ्याच वेळा लाईव्ह चॅट मध्ये नसतो, तुम्हाला एक वेगळी क्लिप दाखवली जात असते हे लक्षात ठेवा.
- समजा पैशांची मागणी झाली तर नंबर ब्लॉक करा. या टोळ्या साधारण एका व्यक्तीला जास्तीतजास्त पाच नंबर्स वरुन कॉल करतात. जर तुम्ही कॉल ब्लॉक करत राहिलात तर आपोआप तुम्हाला फोन येणं बंद होईल.
- न घाबरता सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करा.
- अनोळखी व्यक्तीबरोबर ऑनलाईन जगात मैत्री करताना काळजी घ्या. समोरचे प्रोफाइल म्हणजे ती व्यक्ती खरी आहे की नाही आपल्याला समजू शकत नाही. त्या व्यक्तीने सांगितलेली त्याची वैयक्तिक माहितीही खरी असेलच असं नाही. त्यामुळे कुणावरही ऑनलाईन जगात अंधविश्वास ठेवायचा नाही.
- अनोळखी व्यक्ती नको इतक्या सलगीने ऑनलाईन जगात वागत असेल तर तो धोका समजा.
- कुठल्याही सोशल मीडियावर हाय रेझोल्यूशन फोटो, व्हिडीओ अपलोड करु नका.
- सार्वजनिक ठिकाणी बाथरूममध्ये जाताना, ट्रायल रुम वापरताना नीट तपासून घ्या. कुठे छुपे कॅमेरे नाहीत ना याचा अदांज घ्या.
- आपले फोटो आपण कुणाला पाठवतो आहोत याबाबत सजग असा. प्रेमाच्या नात्यातही नग्न फोटोंचं शेअरिंग करणं धोकादायक असू शकतं.