प्रथमच्या वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती युवावर्गापर्यंत पोहचवण्याकरता स्टाफ गावांमध्ये आणि शहरातील विविध वस्त्यांमध्ये भेटी देत असतात. जून-जुलै 2023 मध्ये आमच्या नाशिक केंद्रातील मोबिलायझिंग स्टाफ नाशिकच्या सुभाष रोड भागात गेले होते. तिथं वस्तीतील बरेचसे युवक, युवती गोणी शिवायचं काम करत आहेत. स्टाफनं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही प्रतिसाद देईनात. वस्ती तशी मोठी होती. त्यामुळं तीन दिवस सलग जाऊन स्टाफनं प्रयत्न केला. मग हळूहळू महिला आणि युवतींनी किमान बोलायला सुरुवात केली. वेल्डिंग कोर्समध्ये इंटरेस्ट दाखवणाऱ्या मुलींसोबत नाशिकचे केंद्रप्रमुख आणि क्लस्टर प्रमुख यांनी एक मिटिंग घेतली.
गोणी शिवून उदरनिर्वाह
या वस्तीतील महिला आणि मुलींना एका दिवसाला 100 गोणी शिवल्या की 70 रुपये मिळायचे. जितक्या लवकर कामावर जाणार तितक्या जास्त गोणी शिवण्याचे काम मिळणार. त्यामुळं या सगळ्या जणींची आपापसात जास्तीत जास्त शिवणकाम मिळण्याकरता स्पर्धाच असायची. कमी काम होईल या भीतीनं मुली दुपारचे जेवण आणि नैसर्गिक विधीकरताही वेळ वाया जाऊ नये म्हणून पाणी पिणं टाळायच्या. याचा आरोग्यावर किती भयानक परिणाम होत असेल याची कल्पनाही करता येत नाही.
वेल्डिंग कोर्सला सुरुवात
वेल्डिंगमध्ये रस दाखवणाऱ्या मुली, महिलांकरता इंडस्ट्रियल व्हिजीट घेतली. या सगळ्या जणींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्यानं, त्यांनी सकाळी शिवणकाम आणि दुपारी वेल्डिंग वर्ग घेण्याचा आग्रह धरला. वस्तीतल्या एका आजीचं घर भाड्यानं घेऊन मुलींना वेल्डिंगचं बेसिक प्रशिक्षण दिलं. आणि मग पुढच्या प्रशिक्षणासाठी सेंटरला यायला त्या तयार झाल्या. कारण त्यांना आता चांगल्या पगाराच्या नोकरीची खात्री होती.
महिंद्रा एण्ड महिंद्रा मध्ये नोकरी
सुभाषनगर वस्तीतील 10 मुलींनी वेल्डिंग कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. यातल्या 8 मुलींना नाशिकमधील महिंद्रा एण्ड महिंद्रामध्ये नोकरी मिळाली. यात काही जणी वेल्डिंगचं तर एक-दोघींना असेंब्ली लाईनवर वेगळ्या कामांवर घेण्यात आलं आहे. प्रथममधून वेल्डिंगचा कोर्स केलेल्या 17 मुली सध्या महिंद्रा एण्ड महिंद्रामध्ये वेल्डर म्हणून काम करत आहेत. 13 हजार मासिक वेतनावर लागलेल्या या मुली वर्ष-दोन वर्षात साडे अठरा हजार रुपये मासिक वेतन घेत आहेत. सोबत चौरस, पौष्टीक आहार आणि बस सुविधाही कंपनीतर्फे आहे. या मुली तीनही शिफ्टमध्ये काम करतात. स्पॉट वेल्डिंगचं काम त्या करतात. आठ तासांच्या एका शिफ्टमध्ये नव्या जॉईनीला 164 स्पॉट वेल्डिंग करायला लागत असल्याचं XUV Body Back Door असेंब्लीवर काम करणारी आकांक्षा सिंग सांगते. तिला कामाला लागून आता एक महिना झाला आहे. स्नेहल गोडसे दोन वर्षांपासून याच फॅक्टरीत काम करत आहे. या दोघीही बी.कॉम आहेत. विशेष म्हणजे यांनी कोर्सच्या आधी वेल्डिंगचा कधी विचारही केला नव्हता. रस्त्यात येता-जाताना वेल्डिंग कधीतरी पाहिलं असेल एवढंच. प्रीती घोडके हिनं तर वेल्डिंगबद्दल कधी ऐकलंही नव्हतं. तिच्या घरून कोर्सला परवानगीही नव्हती. तिच्या पालकांचं समुपदेशन करावं लागलं. प्रथमच्या वेल्डिंग कोर्समुळं त्या आता वेल्डर म्हणून नामांकित कंपनीत नोकरी करत आहेत.
प्रथमचा वेल्डिंग कोर्स
प्रथमच्या वेल्डिंग उपक्रमाची सुरवात 2015 साली महाराष्ट्रातील लातूर मधील किल्लारी प्रशिक्षण केंद्रापासून झाली. वेल्डिंगमध्ये सप्टेंबर 2024 पर्यंत 5200 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेल्डिंग उपक्रमात नेहमीच मुलांचा सहभाग असायचा. पण मुलींनीही या क्षेत्रात प्रवेश घ्यावा, यासाठी 2019 पासून प्रयत्न सुरू झाले. त्यांना शिकविण्यासाठी महिला प्रशिक्षक असावा याकडं लक्ष दिलं. या प्रयत्नांमधून मुलींच्या प्रवेशास सुरुवात झाली. आतापर्यंत एकूण 132 मुलींनी वेल्डिंग प्रशिक्षण घेतले आहे. भारतातील 5 राज्यात एकूण 7 वेल्डिंग प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यातील 3 प्रशिक्षण केंद्रे महाराष्ट्रातील लातूर, नाशिक आणि अहमदनगर इथं आहेत.
कोर्सचे स्वरुप
दोन महिन्याच्या या प्रशिक्षणासाठी निवासी आणि अनिवासी असे दोन्ही पर्याय आहेत. प्रशिक्षणा दरम्यान 15 दिवस कंपनीत प्रैक्टिकल प्रशिक्षण सराव दिला जातो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट आणि नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी देण्यात येते. विद्यार्थ्यांना फक्त दोन हजार रुपये शुल्क भरावे लागते. बाकी प्रशिक्षणाकरता काहीही फी भरावी लागत नाही. विद्यार्थ्यांना मुख्य कोर्स व्यतिरिक्त सॉफ्ट स्किल्स सुद्धा शिकविण्यात येते.
तुम्हांलाही प्रथमचा वेल्डिंग कोर्स करण्यात रस असेल तर, 8879611244 या नंबरवर नक्की संपर्क क