संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये (UNSC) भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या मागणीला फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी उघड पाठिंबा दिला आहे. (UNSC ) ला सर्वसमावेशक बनवण्यासाठी हे महत्त्वाचं असून संस्थेच्या कामात बदल करण्यासाठी अनेक सुधारणांची गरज असल्याचं इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी जर्मनी, जपान, भारत, ब्राझील यांना कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यास समर्थन केलं आहे. तसेच आफ्रिकेतील दोन देशांना प्रतिनिधित्व देण्याच्या बाजूने असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मॅक्रॉन यांनी त्यांच्या भाषणात UNSC च्या कामकाजातील सुधारणा, व्हेटोच्या अधिकाराच्या मर्यादा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ठोस निर्णयांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली.
French President @EmmanuelMacron reiterates France's call for a reform of the UN Security Council that would include a permanent seat for India🇮🇳 during his address at #UNGA79 🇺🇳:@franceonu @francediplo_EN @MEAIndia pic.twitter.com/0cIPxbWM0i
— French Embassy in India 🇫🇷🇪🇺 (@FranceinIndia) September 26, 2024
भारताने दीर्घकाळापासून सुरक्षा परिषदेच्या सुधारणेची मागणी केली आहे. 1945 मध्ये स्थापन झालेली 15-राष्ट्रीय परिषद आता 21 व्या शतकातील बदलत्या परिस्थितीसाठी योग्य नाही आणि ती जागतिक भू-राजकीय वास्तवाला प्रतिबिंबित करत नाही, असा युक्तिवाद भारताकडून करण्यात आला होता.
सध्या, UNSC मध्ये पाच स्थायी सदस्य आहेत आणि 10 अ-स्थायी सदस्य आहेत. जे दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात. स्थायी सदस्यांना व्हेटोचा अधिकार असतो, यामुळे ते कोणताही ठराव रोखू शकतात.
भारताने 2021-22 मध्ये UNSC मध्ये अ-स्थायी सदस्य म्हणून काम केलं होतं आणि आता भारत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवण्यासाठी आघाडीवर आहे. याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा होण्याची गरज असल्याचं त्यांच्या भाषणांतून सांगितलं होत.
UNSC मध्ये भारताच्या सदस्यत्वाला चीनचा विरोध
भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी चीन सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. सुरक्षा परिषदेच्या 5 ही स्थायी सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो यापैकी 4 देश भारताला पाठिंबा देण्यास तयार आहेत. मात्र चीन हा एकमेव देश आहे जो भारताच्या या मागणीला विरोध करत आहे.