पॅशन ते व्यवसाय, ‘सायली राजाध्यक्ष सारीज’चा प्रवास   

Sayali Rajadhyaksha : अत्यंत ग्रेसफुली कोणतीही साडी कॅरी करू शकणाऱ्या, सॉल्ट ॲण्ड पेपर लूक अत्यंत आत्मविश्वासाने कॅरी करणाऱ्या, मोजकीच पण सुंदर ॲक्सेसरी वापरणाऱ्या, परफेक्ट फिटिंगचे ब्लाऊज घालून साडीची शोभा शतपटीने वाढविणाऱ्या आणि एकूण व्यक्तिमत्त्वातच क्लासीनेस असणाऱ्या, ऑफिशियली मॉडेलिंगचे प्रशिक्षण न घेतलेल्या पण कुठल्याही मॉडेलपेक्षा कमी नसणाऱ्या- अश्या कोण? असा जर प्रश्न विचारला तर अर्थातच उत्तर येतं- सायली राजाध्यक्ष! आणि त्या फक्त मॉडेल नाहीत बरं का, तर सायली राजाध्यक्ष सारीज- या ब्रँडच्या निर्मात्या, आंत्र्यप्रुन्यर आणि यशस्वी उद्योजकही आहेत.
[gspeech type=button]

अत्यंत ग्रेसफुली कोणतीही साडी कॅरी करू शकणाऱ्या, सॉल्ट ॲण्ड पेपर लूक अत्यंत आत्मविश्वासाने कॅरी करणाऱ्या, मोजकीच पण सुंदर ॲक्सेसरी वापरणाऱ्या, परफेक्ट फिटिंगचे ब्लाऊज घालून साडीची शोभा शतपटीने वाढविणाऱ्या आणि एकूण व्यक्तिमत्त्वातच क्लासीनेस असणाऱ्या, ऑफिशियली मॉडेलिंगचे प्रशिक्षण न घेतलेल्या पण कुठल्याही मॉडेलपेक्षा कमी नसणाऱ्या- अश्या कोण? असा जर प्रश्न विचारला तर अर्थातच उत्तर येतं- सायली राजाध्यक्ष! आणि त्या फक्त मॉडेल नाहीत बरं का, तर सायली राजाध्यक्ष सारीज- या ब्रँडच्या निर्मात्या, आंत्र्यप्रुन्यर आणि यशस्वी उद्योजकही आहेत. तुम्ही जर फेसबुक, इन्स्टाग्राम असा सोशल मीडिया नियमितपणे वापरत असाल तर सायली राजाध्यक्ष सारीज हे नाव आणि त्यांच्या कमाल सुंदर साड्यांनी तुम्हालाही मोहात पाडलेलं असणारच आहे.

समृद्ध वारसा आणि स्वतंत्र ओळख

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर आणि छत्रपती संभाजीनगरच्या प्रथम स्वयंपाकघराच्या नंदिनी चपळगांवकर यांच्या त्या कन्या. तर ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखिका विजया राजाध्यक्ष यांच्या त्या स्नुषा. अर्थतज्ज्ञ निरंजन राजाध्यक्ष यांच्या पत्नी. घरातून अतिशय समृद्ध असा साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक वारसा. सायलीताई स्वत: राज्यशास्त्रात एम ए गोल्ड मेडलिस्ट. मराठवाड्यात बालपण, तर लग्नानंतर मुंबईत वास्तव्य. आकाशवाणीतलं काम, अनुवाद, अन्न हेच पूर्णब्रह्म तसंच साडी आणि बरंच काही हे दोन लाखांचे फॉलोइंग असलेले ब्लॉग, 2014 ते 2017 दरम्यान डिजिटल दिवाळी अंकाचे प्रयोग असं चहुअंगाने समृद्ध प्रयोग करणारे व्यक्तिमत्त्व.

पॅशनचे रुपांतर व्यवसायात

सायली ताईंनी आपल्या या व्यवसायाला सुरूवात केली ती त्यांच्या वयाच्या पंचेचाळिशीत. अचानक या व्यवसायाकडे वळावं असं का वाटलं, त्याची कशी सुरूवात झाली, हे सांगताना सायलीताई म्हणाल्या, मला खूप आधीपासून कापडाचे रंग, पोत, विणण्याची विशिष्ट शैली, भारतीय हातमाग परंपरेचा समृद्ध वारसा याचं भयंकर फॅसिनेशन म्हणावं असं आकर्षण होतं. स्वत:चे कपडे निवडताना, शिवून घेताना मी अनेक प्रयोग करायचे, साडी तर सगळ्यात लाडकी. अनेक मैत्रिणी मला तुझी चॉईस चांगली आहे, आमच्यासोबत खरेदीला चल असं म्हणायच्या. त्यातूनच साडी आणि बरंच काही हा माझा ब्लॉग सुरू झाला. कशासोबत काय चांगलं दिसेल, याचा अंदाज आपल्याला येतो, हे जाणवायला लागल्यानंतर मी 2017 मध्ये माझ्या राहत्या घरी निव्वळ हौसेपायी साडी, त्यावर शोभणारे ब्लाऊज आणि डिसेंट नेकपीस यांचं एक प्रदर्शन केलं, त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनासाठी मी तीन लाखांची भांडवली मदत नवऱ्याकडून घेतली होती. पण प्रदर्शन इतके छान झाले की मी ते पैसे प्रदर्शन संपताच त्याला परत केले आणि जमलेल्या भांडवलातून लगोलग दिवाळीत दुसरं प्रदर्शन केलं. तिथून सायली राजाध्यक्ष सारीज चा जो प्रवास सुरू झाला, तो आजतागायत कसल्याही कर्ज किंवा कुणाच्याही मदतीविना स्वबळावर उत्तम सुरू आहे.

कॅन्सर आणि इच्छाशक्ती, सकारात्मक विचारांचं पाठबळ

2017 मध्ये सायलीताईंनी या व्यवसायाला सुरूवात केली खरी,पण त्याच वर्षी त्यांना अचानक सामना करावा लागला तो ब्रेस्ट कॅन्सरचा. कॅन्सरया नावाने लोकांना धडकी भरते, हातापायातलं त्राण जातं, लोक निरवानिरवीची भाषा बोलायला लागतात, पण सायलीताईंनी मात्र कॅन्सरच्या सर्जरीनंतर आठव्या दिवशी सायली राजाध्यक्ष सारीजच्या संक्रांत स्पेशल साड्यांसाठीचे खास शूट जवळच्या मैत्रिणींसोबत केले होतें. कॅन्सरने सुरूवातीला धक्का बसणं, ताण येणं, ट्रीटमेंटला धीराने सामोरं जाणं, घरच्यांचा आणि जीवलग मैत्रिणींचा आधार, या सगळ्यात होणारी भावनिक आंदोलनं आणि कॅन्सरवर मात करता येते या सगळ्या विषयी त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर विस्ताराने लिहिलंय. कॅन्सरला सामोऱ्या जाणाऱ्या अनेकांसाठी त्यांचा हा ब्लॉग धीर वाढवणारा आहे. पण आयुष्यात अचानक कॅन्सरने दस्तक दिल्यावर कशाला उगीच व्यवसाय वगैरे दगदग? हे गुंडाळून ठेवूयात असं वाटलं नाही का? हे विचारल्यावर सायलीताई म्हणाल्या, छे असा कधी विचारही केला नाही. कुठलंही संकट, कसलीही परिस्थिती आली तरी डगमगून जायचं नाही, हे माझ्या माहेरून पॉझिटिव्ह माईंडसेटचा वारसाच मी घेऊन आले आहे, म्हणा ना. आणि खरं सांगू का ? उलट मला आनंद देणाऱ्या, या साडीप्रेमानंच मला या आजारातून बाहेर काढायला, मन इतर गोष्टीत रमवायला खूप मदत केलीये. आणि या आजारादरम्यानच मला प्रकर्षाने जाणीव झाली की आपल्याला काही करायचं असेल तर ते हेच- सायली राजाध्यक्ष सारीज हे ब्रँडनेम मोठ्ठं करणं. आणि एकदा हे जाणवल्यावर मागे वळून बघण्याचा प्रश्नच नव्हता. घरी सासर माहेरूनही सगळ्यांचा यालाच पाठिंबा होता, की तू तुझं स्वतंत्र, ओळख निर्माण करणारं काही तरी कर.

 काय वेगळं आहे या साड्यांमध्ये?

घरातून आणि काही प्रदर्शनातून सुरू झालेला सायली राजाध्यक्ष सारीजचा प्रवास आता मुंबईतील, विलेपार्लेच्या व्यावसायिक इमारतीत देखण्या स्टुडिओत शिफ्ट झालेला आहे. प्रत्यक्ष स्टुडिओतून साड्यांची विक्री यासोबतच सायली राजाध्यक्ष सारीजची ऑनलाईन साडी विक्री पण उत्तम प्रकारे होते. किंबहुना त्यांच्या मार्केटिंगचा तोच एक मुख्य स्रोत आहे. या बद्दल बोलताना सायलीताई म्हणाल्या, साड्यांचा व्यवसाय सुरू करताना लॉटमध्ये साड्या आणून विकायला ठेवायच्या नाहीत हे ठरलेलंच होतं. आमचा यूएसपी म्हणजे साड्या क्युरेट करणं. मुळात मला साड्यांचे रंग, पोत, हातमाग, त्याच्यावरचं वर्क, एम्ब्रॉयडरी या सगळ्याची आवड होती, त्याचा अभ्यास मी जाणीवपूर्वक वाढवला. साड्या तयार होतात, विणल्या जातात अश्या मूळ ठिकाणांवरून मी साड्या आणते, त्याही एकगठ्ठा नाही, वेगळी रंगसंगती, उत्तम दर्जाचे कापड, सुरेख पोत, पारंपारिक चिन्हांचा वापर असलेल्या, अजरख, इंडिगो, इक्कत इ. सारख्या भारतीय हस्तकलांचा वापर केलेल्या साड्या आमच्याकडे असतात. त्यामुळे ग्राहकाला साडी निवडताना हजारेक साड्या पाहत बसण्याचा, पाच दुकानं पालथी घालण्याचा वेळ घालवावा लागत नाही. आमच्या कडच्या निवडक साड्या पाहून तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम अशी साडी खरेदी करू शकता. आमची सातत्याने प्रदर्शनंही होत असतात.

सोशल मीडियाचा फायदा

लॉकडाऊनच्या काळात यातलं काहीच शक्य नव्हतं. तेव्हा मग आम्ही साड्यांच्या वैशिष्ट्यांचे छोटे व्हिडिओज, रिल्स तयार करणं, ते इन्स्टाग्राम, फेसबुकवर प्रकाशित करणं हे सुरू केलं. आणि ऑनलाईन मार्केटिंगला खूप छान प्रतिसाद मिळू लागला, आणि भारतासह अमेरिका, इंग्लंड, आखाती देश, व्हिएतनाम अश्या अनेक ठिकाणी सायली राजाध्यक्ष सारीज पोहोचायला लागल्या, साड्यांसोबत आम्ही हटके असे ब्लाऊजही विक्रीस ठेवायला लागलो. आमचा स्टाफ सुद्धा तीनवरून तीसवर न्यावा लागला, मोठ्या जागेत स्टुडिओ शिफ्ट करावा लागला, इतका फायदा या सोशल मीडियावरून केलेल्या ब्रँडिंगचा झालाय.

 समृद्ध परंपरेचा भाग

सायलीताई सांगतातया व्यवसायात सगळ्यात समाधान देणारी गोष्ट म्हणजे, स्थानिक ठिकाणी जाऊन तिथले कलाकार, विणकर यांना भेटून ते काम प्रत्यक्ष होताना पाहणं. म्हणजे उदा. राजस्थानात जाऊन ब्लॉक प्रिटिंग कसं होतं, पारंपरिक मोटिव्हज कोणते आहेत,पारंपरिक साडी कोणती आहे, ती कशी विणली जाते, वेगवेगळ्या विणींना मोटिव्हजना काय म्हणतात, त्या मागचा विचार काय आहे? प्युअर सिल्क साड्या कश्या विणल्या जातात, रेशमाचे, सुताचे, कापडाचे कोणकोणते प्रकार आहेत, ते मिक्स अन्ड मॅच करून काय मज्जा आणता येते? हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायला मिळणं, ते आपल्या ग्राहकांना समजावून सांगता येणं आणि भारतातल्या समृद्ध वस्त्रपरंपरेचा एक हिस्सा होणं, हे माझ्यासाठी फार फार आनंददायी आहे.

तीन लाख ते कोट्यवधींची उलाढाल

सायली राजाध्यक्ष सारीजचे भारतासह परदेशातही ग्राहक आहेत. प्रसिद्ध उद्योजक, अभिनेते- अभिनेत्री, सर्व पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री या स्वत: आणि त्यांचे कुटुंबिय सायली राजाध्यक्ष सारीजला पसंती देतात. याशिवाय आपल्या लग्नासाठी एखादी तरी साडी सायली राजाध्यक्ष सारीजची असावी, किंवा परदेशातून आल्यावर आवर्जून स्टुडिओला भेटी देणारे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय ग्राहकही मोठ्या संख्येने आहेत. तीन लाखांपासून सुरू झालेल्या या व्यवसायाने आता कोट्यवधीच्या उलाढालीत प्रवेश केलेला आहे. सर्वोत्तम गुणवत्तेत तडजोड नाही, सातत्य, वेगळेपणा टिकवून ठेवणे आणि ग्राहकांना घरबसल्या उत्तम सेवा पुरविणे, यामुळे सायली राजाध्यक्ष सारीज आपलं नाव दिमाखाने उंचावत नेतेय.

6 Comments

  • Sunita Mandape

    प्रेरणादायी प्रवास सायली राज्याध्यक्ष यांचा, , 28 सप्टेंबर ला कोल्हापूर येथे सयाजी मध्ये भरलेल्या प्रदर्शनात प्रत्यक्ष भेटीचा योग आला. त्यांचे बरोबर फोटो पण काढला, अगदी निगर्वी आणि छान व्यक्तिमत्व

  • Manjiri

    Inspiring indeed. Kudos to Sayli tai

  • तनुजा मुधोळकर

    सायली मॅडम तुम्ही inspiration आहात. तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला नक्कीच आवडेल.

  • Suchitra

    Surekh

  • Vaishali Chavan

    मस्तच… स्नेहल! सायलीताईच्या कल्पकतेचे, कष्टाचे उत्तम दर्शन घडवले!

  • Suchita

    जबरदस्त inspiring!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

6 Responses

  1. मस्तच… स्नेहल! सायलीताईच्या कल्पकतेचे, कष्टाचे उत्तम दर्शन घडवले!

  2. सायली मॅडम तुम्ही inspiration आहात. तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला नक्कीच आवडेल.

  3. प्रेरणादायी प्रवास सायली राज्याध्यक्ष यांचा, , 28 सप्टेंबर ला कोल्हापूर येथे सयाजी मध्ये भरलेल्या प्रदर्शनात प्रत्यक्ष भेटीचा योग आला. त्यांचे बरोबर फोटो पण काढला, अगदी निगर्वी आणि छान व्यक्तिमत्व

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ