आजच्या तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया जमान्यात, स्किन केअर आणि ब्युटी ट्रेण्ड्स यांचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. नवीन ट्रेण्ड्सचा मागोवा घेत, लोक आपल्या सौंदर्य आणि आरोग्याच्या बाबतीत अधिक सजग झाले आहेत. परंतु, या ट्रेण्ड्सचा खरोखरच आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो का, की हे फक्त दिखावा आहे? याचा विचार नक्कीच व्हायला हवा.
सौंदर्याची परिमाणं
ब्युटी आणि स्कीन केअर एकमेकांच्या हातात हात घालून चालणारे दोन विषय…. कधी माप इकडे झुकतं तर कधी तिकडे. ते अँबिग्राम कंम्पोझिशन्स (Ambigram compositions) असतात ना तसंच. म्हणजे बघा हं ‘देवाने एवढं छान शरीर,रूप आणि त्वचा दिलीय, कशाला हवी ती क्रीम्स नी मेकअप!!!’ तर दुसरीकडे त्याच सुंदर फीचर्स ना जरा लिपस्टिकचा, काजळाचा नाही तर टिकलीचा टच् दिला तर ? केस कधी बांधले तर कधी मोकळे.. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं, हा विषय न आवडणारा विरळाच म्हणावा लागेल. एकेकाळी स्त्रियांचा राखीव असणारा विषय आज लिंग, रंग आणि आकाराच्या पलिकडे गेलाय. ‘Every individual is Beautiful.’ प्रत्येकाला अजून सुंदर व्हायचं आहे, आणि त्यासाठी आज प्रत्येक स्क्रोलला एक पर्याय आहे. कोणासाठी नैसर्गिक उपाय उपलब्ध आहे. तर कोणाला, सिरम, मास्क सारखे प्रॉडक्टस् हवेत. काहीजण आहारातून ब्यूटीफुल होण्याची किमया साधायचा प्रयत्न करत आहे. तर काही जण ‘माइंड ट्रेनिंग’ करून विचारातून सुंदर होण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुणाई ‘के’ ब्युटी च्या मागे वेडी झाली आहे. तर आधीच्या पिढीला ‘आय ब्युटी’ मध्ये शहाणपण दिसतंय. ‘आय ब्युटी’ म्हणजे आयुर्वेद हो. तर एकूणात काय सौंदर्य, ब्युटी, स्किन केअर हे महत्वाचे विषय होते, आहेत आणि राहतील.
स्कीनकेअर जीवनशैलीचा भाग
आजचा विचार करायचा झाला तर हे विषय फॅशन किंवा फॅड राहिलेले नसून जीवनशैलीचा भाग झाले आहेत. जसं मी म्हटलं त्याप्रमाणे ब्युटी किंवा सौंदर्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. पण प्रत्येकासाठी सुरुवात “स्किन केअर’पासूनच होते. स्किन केअर म्हणजे विविध प्रॉडक्टस किंवा कॉस्मेटीक्सचा वापर नसून त्वचेच्या आरोग्यासाठी योग्य सवयी लावून घेणे सुद्धा आहे. त्यालाच आज आपण रेजिम (Regime) असंही म्हणतो. हेल्दी स्कीन म्हणजे आरोग्याचं प्रतिबिंब मानलं जातं. म्हणजेच ह्याची सुरूवात आहार – विहारापासून होते. आपण जे खातो, ते आपल्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर दिसतंच. आपल्या पार्ट्या, हॅन्ग आऊट दिसतंच की चेहऱ्यावर ! म्हणजे डोळ्याखाली काळी वर्तुळ, एखादं पिंपल दिसतंच ना. आणि आता यात भर पडली आहे ओटीटीची. रात्र रात्र जागून केलेलं बिंज वॉचिंग हे ही दिसतंच नंतर चेहऱ्यावर.
शरीराचं संरक्षक कवच
तर सांगायचा मुद्दा हा की, त्वचा किंवा स्किन हे शरीराचं संरक्षक कवच आहे. बाहेरील घातक गोष्टींपासून शरीराचं रक्षण करणे, तसंच शरीरातील प्रमुख आणि उपयोगी गोष्टी बाहेर जाऊ न देणे, हे त्वचेचं मुख्य काम. त्याचबरोबर UV किरणांपासून रक्षण, शरीराचं तापमान नियंत्रण, घामावाटे टॉक्सीन्स म्हणजे विषारी घटकांच उत्सर्जन अशा अनेक प्रकारे स्किन आपलं संरक्षण करते. तिला ताजीतवानी आणि निरोगी ठेवणे आवश्यक आहे. कारण त्वचेच्या आरोग्याचा थेट परिणाम आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर आणि आरोग्यावर होतो.
चांगल्या त्वचेसाठी –
- CTM – क्लिन्जींग, टोनिंग, मॉइस्चराइजिंग. अत्यंत महत्वाचं रुटीन दिवसातून किमान दोन वेळा व्हायला हवं.
- SPF – Sun Protecting factor. सध्या SPF 70/90 चा जमाना आहे. पण लक्षात घ्यायला हवं की, जेवढे SPF कांऊंट जास्त तेवढं प्राडक्ट ऑयली. सर्वसामान्य भारतीय त्वचेसाठी SPF 35/40 पुरेसं आहे. हे वापरायची विशिष्ट पद्धत आहे.
- नाईट क्रीम – हे स्किनला रिपेर आणि मेन्टेनन्ससाठी मदत करते. त्यामुळे गाडी बंद म्हणजे शरीर विश्रांती घेत असताना वापरायला हवं. म्हणजेच रात्री झोपताना.
तर ह्या झाल्या बेसिक गोष्टी, अजूनही खूप Niche Cosmetics आहेत, के ब्युटीची 10 स्टेप्स रेजिम आहे. पण आपल्याला कुठून सुरुवात करायची किंवा बदल कुठून करायचाय ते ठरवायचंय. त्वचेची योग्य काळजी घेतल्याने तुम्ही तुमच्या सौंदर्याचे नैसर्गिक स्वरूप अधिक खुलवू शकता. नियमित स्वच्छता, मॉइस्चरायझिंग आणि सनस्क्रीनचा वापर, तसेच संतुलित आहार, व्यायाम या सर्व गोष्टी त्वचेला आणि संपूर्ण सौंदर्याला अधिक आकर्षक बनवतात.
त्याचबरोबर योग्य मेकअप तुम्हाला कॉन्फीडन्ट (confident) दिसायला मदत करू शकतो. परंतु, मेकअप करताना त्याचे योग्य प्रमाण आणि प्रकार निवडणे आवश्यक आहे.
केस हे सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग असतात. त्यांची योग्य काळजी घेतल्यास तुम्ही नेहमी क्राऊंनिंग ग्लोरी (crowning glory) दिसू शकता.
चॉईस तुमचा आहे, आणि फायनली ड्रेसिंग टेबलही तुमचंच आहे. येणाऱ्या काही दिवसांत मला तुमच्याशी सौंदर्यविश्वाबद्दल बोलायला लिहायला आवडेल.