कर्स्टी कॉव्हेंट्रीने आपल्या देशासाठी ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकलचं आणि क्रीडा क्षेत्रातीलच सर्वात मोठ्या क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मानही मिळवला. आयओसीचं अध्यक्षपद भूषवणारी ती पहिली महिला आणि पहिली आफिकन व्यक्तीही ठरली आहे. आयओसी अर्थातच इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीच्या 144 व्या सर्वसाधारण सभेत तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ग्रीसमधील कोस्टा नवारिनो इथे पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत 97 पैकी 49 मतं पहिल्याच फेरीत मिळवत तिनं आपला विजय निश्चित केला. 24 जून 2025ला ती पदभार स्वीकारेल. तब्बल 12 वर्ष अध्यक्षस्थानी असलेल्या थॉमस बाक यांची जागा आता ती घेणार आहे. वयाच्या 41 व्या वर्षी आयआयोसीसारख्या संघटनेचं अध्यक्षस्थान भूषवण्याची संधी लाभलेल्या कर्स्टीचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा 8 वर्षांसाठीचा असणार आहे.
झिम्बाब्वेची गोल्डन गर्ल
कर्स्टी कोव्हेंट्री झिम्बाब्वेची एक यशस्वी जलतरणपटू आहे. आपल्या आई आणि आजोबांकडून तिने जलतरणाचं प्रशिक्षण घेतलं. 5 ऑलिम्पिकमध्ये तिने आपल्या देशाचं म्हणजे झिम्बाब्वेचं प्रतिनिधीत्व केलं. सिडीनीमध्ये 2000 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी कर्स्ट्रीने आपलं पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्या-वहिल्या ऑलिम्पिकमध्ये तिला आपल्या देशासाठी मेडल जिंकून देता आलं नाही. यानंतर 2004 साली अथेन्समध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तिनं आपल्या देशासाठी जलतरण या क्रीडा प्रकारात ऐतिहासिक सुर्वर्णपदक मिळवलं. त्यानंतर 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्येही तिने सुवर्णपदकाची कमी केली. 2006 ते 2016 या कालावधीत तिनं पाच ऑलिम्पिकमध्ये दोन, गोल्ड, चार सिल्व्हर आणि एक ब्राँझ मेडल अशा एकूण सात ऑलिम्पिक पदकावर आपलं नाव कोरलं. कुठल्याही आफ्रिकन खेळडूला आजपर्यंत जमलेली नाही अशी कामगिरी तिनं ऑलिम्पकमध्ये केली. ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदक पटकाल्यामुळे तिला झिम्बाबब्वेची गोल्डन गर्ल म्हणून संबोधलं गेलं.
क्रीडा प्रशासनात प्रवेश
जलतरणाच्या दुनियेत ठसा उमटवल्यानंतर कर्स्ट्रीनं क्रीडा प्रशासन क्षेत्रातही आपलं योगदान देण्याचं ठरवलं. 2013 मध्ये तिची आयओसी एथलिट्स कमिशनची सदस्य म्हणून पहिल्यांदा निवड झाली. 2021 पर्यंत तिनं ही भूमिका बजावली. 2018 मध्ये आयओसीच्या एथलेटीक्स कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याचप्रमाणे 2012 ते 2021 पर्यंत वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीमध्ये (WADA) आयओसी एथलिट आणि 2014 ते 2021 या कालावधीत वाडाच्या एथलिट समितीचं प्रतिनिधीत्वही केलंय. याबरोबरच 2017 ते 2024 पर्यंत आंतरराष्ट्रीय सर्फिंग फेडरेशनच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी तिनं सांभाळली होती.
झिम्बाब्वेच्या संसदेत घुमला कॉवेंन्ट्रीचा आवाज
क्रीडा क्षेत्रातील या भरिव कामगिरीवरच कर्स्टीने खेळाच्या मैदानावरुन थेट झिम्बाब्वेची संसदही गाजवली आहे. 2018 साली ती आपल्या देशाची क्रीडामंत्री झाली. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. मॅच फिक्सिंग आणि गैर प्रकार रोखण्यासाठी अनेक कायदे केले आणि ते अमलातही आणले. याचदरम्यान, लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे तिने झिम्बाब्वे फुटबॉल फेडरेशन बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे त्यांच्या फुटबॉल संघटनेवर फिफाने 18 महिन्यांची बंदही घातली होती. कर्स्टीच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तिच्यावर कौतुकांचा वर्षाव झालेला पाहिला मिळाला होता. हा निर्णय घेणं किती कठीण होता असं तिला विचारण्यात आलं. त्यावेळी कॉव्हेंट्रीनं हा योग्यच होता असं उत्तर दिलं. सध्याच्या घडीला मंत्रिमंडळात क्रीडा, कला आणि रिक्रिएशन या विभागाची धुरा ती यशस्वीपणे सांभाळतेय. ज्याप्रमाणे तिच्या चांगल्या निर्णयांचं कौतुक झालं त्याचप्रमाणे कर्स्ट्री टीकेला सामोर जावं लागतंय.
कौतुक आणि टीका
ज्यावेळी कर्स्ट्री कॉव्हेंट्री इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीच्या निवडणूक जिंकल्यानंतर आपली पहिलीच पत्रकार परिषद घेत होती, त्याचवेळी दुसऱीकडे झिम्बाब्वेचा संघ 2026 चा फुटबॉल वर्ल्ड कप पात्रता फेरीचा सामना शेजारील देश दक्षिण आफ्रिकेतील डबर्नमध्ये खेळत होता. एकीकडे कॉव्हेंट्री आयओसीची लढाईल जिंकली. मात्र आयओसी अध्यक्षांच्या संघाला फुटबॉलचे सामने खेळण्यासाठी स्वत: चे मैदानही नाही. यावरुन तिला रोष ओढवून घ्यावा लागलाय. दरम्यान, कायमच झिम्बाब्वेमधील मैदानांच्या दयनीय अवस्थेबाबत क्रीडा जगतातून टीका होत आली आहे. तसंच 2022 मध्येच फिफाने सरकारच्या हस्तक्षेपामुळे झिम्बाब्वे फुटबॉल संघावर तात्पुरती बंदही घातली होती. 2023 मध्ये ती उठवण्यात आली.
नव्या अध्यक्षांसमोरी आव्हाने
आयओसीच्या अध्यक्षपदी कर्स्ट कॉव्हेंट्री विराजमान झाली आहे. मात्र, 41 वर्षीय क़ॉव्हेंट्रीला यादरम्यान अनेक आव्हाने पार करावी लागणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर तिला पहिली अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे ती म्हणजे 2028 मध्ये अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचं. यावेळी तिला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सामना करावा लागेल. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर तिला याबाबत विचारले असता कॉव्हेंट्रीने मी वयाच्या विसाव्या वर्षापासून अनेक कठोर पुरुषांचा सामना करत आलीय असं उत्तर दिलं. याबरोबरच निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या रशियाचं पुनरागमन ऑलिम्पिकमध्ये होणार का? या प्रश्नाचं उत्तरही तिला शोधावं लागणार आहे. कुठल्याही देशावर खेळावरून बंदी घालण्याच्या मी विरोधात आहे. रशियावरील निलंबनाबाबत एक नवी समिती स्थापन करण्याचे आश्वासन तिने दिले आहे. या प्रमुख आव्हानांचा सामना तिला करावाच लागले. त्याचप्रमाणे महिलांचे क्रीडा प्रकार वाचवणे, हवामानबदल, ऑलिम्पिकसाठी प्रसार आणि प्रायोजक शोधणे या समस्याही तिला सोडवाव्या लागतील.
हेही वाचा – मुंबई इंडियन्स: उदयोन्मुख क्रिकेटपटू घडवणारी फॅक्टरी
कोणता देश करणार 2036 ऑलिम्पिकचे आयोजन
भारताच्या दृष्टीने विचार केला तर 2036 च्या ऑलिम्पिक यजमानपदच्या शर्यतीत भारत आहे. भारताबरोबर कतार, तुर्की आणि इतर काही देशांपैकी कोणत्या देशाला यजमानपद मिळेल याचा महत्त्वपूर्ण निर्णय तिला घ्यावा लागणार आहे. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी कॉव्हेंट्री आयओसीच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले होते. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात आलाय. 128 वर्षांनी क्रिकेट या खेळाचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होत आहे. त्यामुळेच जय शाहांनी कॉव्हेंट्री यांचे अभिनंदन करत तुमच्या बरोबर काम करण्यास आतूर असल्याची भावना बोलून दाखवली होती. दुबईत नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमी फायनलच्या मॅचदरम्यान कॉव्हेंट्री यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे 2036 मध्ये भारताला ऑलिम्पिक आयोजनाची संधी कॉव्हेंट्री देणार का? या प्रश्नाचं उत्तर काही काळात क्रीडाप्रेमींना मिळेल.
4 Comments
मस्त लिहिल आहेस.
खूप छान आणि माहितीपूर्ण लेख!
तपशीलवार माहिती दिल्यामुळे वाचताना ज्ञानात भर पडत गेली.
खूप छान माहितीपूर्ण लेख