साताऱ्यातील कराड तालुक्यातल्या उंब्रज गावातल्या तरुणीचा अमेरिकेमध्ये गंभीर अपघात झाला आहे. तिथल्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये आयसीयू विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या उपचारासंबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तिच्या पालकांनी तिथे हजर असण्याची गरज असल्याचं हॉस्पीटलने म्हटलं आहे. मात्र भारतातील अमेरिकन व्हिसा कार्यालायाकडून तरुणींच्या पालकांच्या व्हिसाची प्रक्रियाच पूर्ण केली जात नाही आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या घटनेची दखल घेत या कुटुंबियांना मदत करावी, अशी विनंती ‘श्रेष्ठ महाराष्ट्रा’तर्फे करत आहोत.
दहा दिवसापासून आयसीयूमध्ये
कराड तालुक्यातली उंब्रज गावातली नीलम शिंदे ही 35 वर्षाची तरुणी अमेरिकेत शिक्षणासाठी गेली आहे. एमएसच्या शेवटच्या वर्गात नीलम शिकत आहे. कॅलिफोर्निया राज्यातल्या सैक्रांमेंट या शहरात ती राहते.
दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी अमेरिकेच्या वेळेनुसार, मॉर्निंग वॉक करीत असताना एका भरधाव वेगात असलेल्या गाडीनं तिला धडक दिली. या अपघातात तिला गंभीर जखमा झाल्या. लागलीच तिला तिथल्या यूसी डेव्हिस मेडिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं. शरीरावर ठिकठिकाणी झालेल्या जखमा आणि मेंदूलाही मार बसल्यामुळे तिला अतिदक्षता विभागात ठेवलं आहे.
नीलम हिचा 14 फेब्रवारीला अपघात झाला. भारतात तिच्या आईवडिलांना या अपघाताची माहिती 16 फेब्रुवारीला तिच्या महाराष्ट्रीय रुममेटकडून मिळाली.

मेडिकल इमरजन्सी व्हिसा देण्यास दिरंगाई
अपघात होऊन दहा दिवस उलटले आहेत तरी तिच्या तब्येतीमध्ये सुधार नाही. मेंदूला मार लागल्यामुळे त्यासंबंधित शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, यासंबंधित निर्णय घेण्यासाठी तिच्या रक्तातिल नातेवाईकांचं तिथं हजर असणं गरजेचं आहे. नीलम ही स्वत: या जबर मारामुळे दहा दिवसापासून कोमामध्ये आहे. त्यामुळं ती काहीच हालचाल वा निर्णय घेऊ शकत नाही. यासाठी हॉस्पिटल प्रशासनाकडून तिच्या वडिलांना आणि सोबतीला आणखीन एका नातेवाईकाला अमेरिकेमध्ये येण्यासाठी इमरजन्सी मेडिकल व्हिसा द्यावा, असं विनंतीवजा पत्र देण्यात आलं आहे.
नीलमच्या विद्यापीठाकडूनही तात्काळ इमरजन्सी मेडिकल व्हिसा देण्यासंदर्भातलं पत्र दिलं आहे. तरिही, भारतातील अमेरिकन व्हिसा कार्यालयाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नाही आहे.
मंत्र्यांच्या मुलांच्या दिमतीला क्षणात सारं काही
काही दिवसांपूर्वी घरातल्या भांडणामुळे माजी मंत्र्यांचा मुलगा थेट खासगी विमानातून बँकॉकला निघाला होता. वडील माजी मंत्री असल्यामुळे लागलीच अपहरणाचा दावा करुन मुलाला परत आणलं. ‘त्या’ मुलाला क्षुल्लक कारणासाठी क्षणात सगळ्या सुविधा उपलब्ध होतात.
तर दुसरीकडे जी मुलगी गेल्या दहा – अकरा दिवसांपासून मृत्यूशी झुंजत आहे, तिच्या पुढच्या उपचारासंदर्भात निर्णय घेण्यासाठी तिच्या पालकांचं तिथं जाणं अतिशय महत्त्वाचं आहे, त्यासंदर्भात हॉस्पीटल आणि विद्यापीठाकडूनही आवश्यक ती कागदपत्रे मिळालेली असताना प्रशासन ही दिरंगाई का करत आहे? का कोणतेच राजकीय नेते या कुटुंबाला नियमांच्या पलिकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने मदत करत नाहीत?

श्रेष्ठ महाराष्ट्राची विनंती
नीलम ही गंभीर परिस्थिती असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या मेंदू संबंधित शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तिच्या कुटुंबियांचं तिच्यासोबत अमेरिकेत असणं खूप गरजेचं आहे. या कुटुंबांची परिस्थिती समजुन घेऊन या कायदेशीर प्रक्रियेत राज्य सरकारने मध्यस्थी करुन त्यांना मदत करावी, अशी विनंती ‘श्रेष्ठ महाराष्ट्रा’च्या माध्यमातून करतो.