जाहिरातीमुळे प्रेक्षकांचा वेळ घालवल्याबद्दल पीवीआर आयनॉक्स थिएटरला भरावा लागणार लाखोचा दंड

Inox Theater : थिएटरमध्ये गेल्यावर सिनेमा सुरू होण्याआधी थिएटरकडून दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती या पाहाव्याच लागतात. पण अर्धा तास जाहिराती दाखवून सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा वेळ वाया घालवला आणि त्याला मानसिक त्रास दिल्याबद्दल पीवीआर आयनॉक्स थिएटरला दंड भरावा लागणार आहे.
[gspeech type=button]

थिएटरमध्ये गेल्यावर सिनेमा सुरू होण्याआधी थिएटरकडून दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती या पाहाव्याच लागतात. घरासारखं रिमोट घेतलं आणि चॅनल बदललं असं करता येत नाही. पण या जाहिराती किती वेळ दाखवायच्या आणि कोणत्या जाहिराती असल्या पाहिजेत याचे सुद्धा नियम आहेत. आणि जेव्हा थिएटरकडून हे नियम पाळले जात नाहीत तेव्हा त्यांना लाखोचा दंड भरावाच लागतो. 

सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकाला अर्धा तास जाहिराती दाखवून त्याचा वेळ वाया घालवला आणि त्याला मानसिक त्रास दिल्याबद्दल पीवीआर आयनॉक्स थिएटरला दंड भरावा लागणार आहे. ही घटना घडलीये बेंगळुरूमध्ये. 

अर्ध्या तासाच्या जाहिराती ते ‘मानसिक वेदना’

अभिषेक एमआर हा तरुण 2023 साली पीवीआर आयनॉक्स थिएटरमध्ये ‘सॅम बहादूर’ हा सिनेमा पाहायला गेला होता. सिनेमाची वेळ दुपारी 4 ते 6.30 अशी होती. संध्याकाळी 6.30 वाजता सिनेमा संपल्यावर अभिषेकला कामासाठी निघायचं होतं. पण दुपारी 4.30 वाजले तरी सिनेमा सुरू झाला नव्हता. अर्धा तास सिनेमाच्या पडद्यावर जाहिराती आणि वेगवेगळ्या चित्रपटाचे ट्रेलर सुरू होते.

अभिषेकने कंटाळून ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार नोंदवली. या तक्रारीमध्ये त्याने थिएटरने त्याचा वेळ वाया घालवला असून यामुळे त्याच्या महत्त्वाच्या मीटिंग्ज होऊ शकल्या नाहीत. तसंच या घडल्या प्रकारामुळे त्याला मानसिक त्रास झाल्याचं त्यानं म्हटलं आहे. वेळेचा झालेला अपव्यय हा पैशांनी भरून निघणार नाही असंही त्याने त्याच्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. 

जाहिरातींचा अतिरेक हे बेकायदेशीर आहे

ग्राहक न्यायालयाने अभिषेकच्या बाजूने निर्णय देत पीवीआर आयनॉक्स थिएटरला फटकारलं आहे. सिनेमा सुरू होण्यापूर्वी अतिरिक्त जाहिराती दाखवणं हे नियमबाह्य असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.  आपल्या सुनावणीत कोर्टाने पुढे म्हटलं आहे की, आताच्या जमान्यात वेळ हाच पैसा आहे. प्रत्येकांच्या वेळेची किंमत असते. त्यामुळे एखाद्याच्या वेळेचा आणि पैशांचा गैरवापर करण्याचा अधिकार कोणालाच नाही. जवळपास 25 – 30 मीनिट थिएटरमध्ये नुसतं बसून राहणं हे शक्य नाही. आणि ज्या व्यक्तींना खूप कामं असतात अशा व्यक्तींना सिनेमासाठी अर्धा तास थिएटरमध्ये ताटकळत ठेवून त्यांना जाहिराती दाखवत राहणं पूर्णत: चुकीचं आहे. मनोरंजनासाठी ते थिएटरमध्ये येतात याचा अर्थ त्यांच्याजवळ खूप वेळ असतो. त्यांना काही कामं नाहीत असा होत नाही.

गैरसोयीबद्दल थिएटरला भरावा लागणार दंड

थिएटरच्या या गैरवर्तनामुळे याचिकाकर्ते अभिषेक यांना त्रास झाल्याबद्ल कोर्टाने थिएटरला दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार, बेकायदेशीररित्या अर्धा तास जाहिराती दाखवत चुकीच्या पद्धतीने व्यावसाय करीत असल्याबद्दल थिएटरला 50 हजार रुपयाचा दंड भरावा लागणार आहे. तर याचिकाकर्ते अभिषेक यांना या घटनेमुळे झालेल्या मानसिक त्रासाची भरपाई 5 हजार रुपये, तक्रार दाखल करणे आणि अन्य सगळ्या बाबींच्या कार्यवाहीसाठी होणारा खर्च 10 हजार रुपये सुद्धा थिएटरला भरावा लागणार आहे. शिवाय नियमबाह्य पद्धतीने जाहिराती दाखवून व्यवसाय केल्याबद्दल 1 लाखाचा अतिरिक्त दंड ठोठावला आहे.  

कोर्टाच्या आदेशानुसार, 15 फेब्रुवारीपासून पुढच्या 30 दिवसात थिएटरला हा दंड भरावा लागणार आहे. 

पीवीआर आयनॉक्सने कोर्टात काय प्रतिवाद केला

कोर्टातल्या सुनावणी दरम्यान पीवीआर आयनॉक्सने कोर्टाला सांगितलं की, सिनेमा सुरू होण्यापूर्वी ‘जनहितार्थ’ अंतर्गत असलेल्याच जाहिराती दाखवण्यात आल्या होत्या. 

मात्र, अभिषेक यांनी त्यावेळी दाखवण्यात आलेल्या जाहिरातीचा व्हिडीओ चित्रीत केला होता, जो त्यांनी कोर्टात सादर केला.  पुराव्यादाखल सादर केलेला हा व्हिडीओ हा पायरसी कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचा उलटपक्षी दावा आयनॉक्सने केला. मात्र, कोर्टाने तो फेटाळून लावत म्हटलं की, याचिकाकर्त्याने केवळ जाहिराती चित्रीत केल्या आहेत, सिनेमा नाही. म्हणून याठिकाणी पायरसीचं उल्लंघन होत नाही. 

काही प्रेक्षक हे उशिराने थिएटरमध्ये येतात, त्यानंतर सिक्युरिटी चेकची प्रक्रिया पूर्ण करण्यात थोडा वेळ जातो, त्यामुळे उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांचा सिनेमाचा सुरुवातीचा  भाग पाहायचा राहू नये म्हणून या अतिरिक्त जाहिराती दाखवतो असा प्रतिवाद थिएटरने केला. 

त्यावर कोर्टाने म्हटलं की, थिएटरची ही कृती अन्यायकारक आहे. कारण जी लोकं वेळ काढून सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये वेळेवर पोहोचले आहेत, त्यांच्या वेळेची मग काहीच किंमत नाही का? जे उशिराने येत आहेत त्याच्यामुळे या प्रेक्षकांवर अन्याय का? त्यांचा वेळ का फुकट घालवायचा असे प्रतिप्रश्न कोर्टाने केले.

सार्वजनिक सेवा घोषणा 10 मिनिटाच्याच असाव्यात

दरम्यान, बऱ्याच थिएटरमध्ये अशाच पद्धतीने अवैध जाहिराती दाखवून प्रेक्षकांचा वेळ फुकट घालवला जातो. त्यामुळे हा केवळ एका व्यक्तिला झालेला त्रास नसून जनहितार्थ असल्याचं म्हणत कोर्टाने थिएटरला सूचना दिल्या.  यावेळी ग्राहक न्यायालयाने सगळ्या थिएटर्सना उद्देशून सार्वजनिक सेवा घोषणा जाहिराती या फक्त 10 मिनिटेच दाखवायच्या. त्याही सिनेमा सुरू होण्यापूर्वी किंवा मधल्या वेळेत (इंटरवल) दाखवायच्या असे निर्देश देण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ