प्रसिद्ध चित्रकार साल्वादोर डाली कधी भारतात आले नसले तरी त्यांचा भारताशी एक खास संबंध आहे. 1967 मध्ये, एयर इंडिया ही त्यावेळी जगातल्या सर्वात प्रसिद्ध एअरलाइन्सपैकी एक कंपनी होती. एयर इंडियाने साल्वादोर यांना एक हत्तीचं लहान पिल्लू भेट म्हणून दिलं होतं.
एयर इंडियाने डालीला हत्ती का दिला?
1960 च्या दशकात, विमानप्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नव्हतं, तर तो एक वेगळा अनुभव होता. बिझनेस क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या प्रवासात सिगार, कॅविअर आणि शॅम्पेनचा आनंद घेता येत असे.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर, एयर इंडियाने कलेला प्रोत्साहन देण्यासाठी खूप काम केलं. त्यांच्या ‘महाराजा कलेक्शन’मध्ये अनेक कलाकृती होत्या. ‘द इंडियन एक्सप्रेस’नुसार, 1956 मध्ये बी. प्रभा यांचे Six Watercolours चित्रं फक्त 87.50 रुपयांना विकत घेऊन या कलेक्शनची सुरुवात झाली होती. हळू हळू एयर इंडियाने 4000 पेक्षा जास्त कलाकृती जमा केल्या.
डाली यांनी एयर इंडियासाठी काय बनवलं?
1967 मध्ये, एयर इंडियाचे जनसंपर्क अधिकारी जोत सिंह, न्यूयॉर्कमध्ये साल्वादोर डाली यांना भेटले आणि त्यांनी डाली यांना एयर इंडियासाठी काहीतरी डिझाइन करायला सांगितलं. डाली तयार झाले आणि त्यांनी एक खास प्रकारचा अनग्लेझ्ड पोर्सलीन ॲशट्रे (unique unglazed porcelain ashtray) बनवला. असं म्हणतात की या ॲशट्रेच्या 500 प्रती बनवल्या गेल्या. पण तरी नक्की किती तयार झाल्या याबद्दल अजूनही वाद आहे.
ॲशट्रेसोबत आलेल्या पुस्तिकेत डाली यांनी लिहिलं होतं, “हत्तीच्या डोक्याचं प्रतिबिंब हंस (swans) सारखं दिसतं आणि swans चं प्रतिबिंब हत्तीसारखं. मी ॲशट्रेसाठी हेच केलं आहे. उलटा केलेला हंस हत्तीचं डोकं बनतो आणि उलटा केलेला हत्ती हंस बनतो.”
डालीला हत्ती का हवा होता?
डालीने डिझाईन केलेला तो खास ॲशट्रे नुकताच नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये “महाराजा ट्रेझर: सिलेक्ट वर्क्स ऑफ आर्ट फ्रॉम द फेम्ड एयर इंडिया कलेक्शन” या प्रदर्शनात दाखवण्यात आला होता. हा ॲशट्रे भेट मिळालेल्या एयर इंडियाच्या खास ग्राहकांमध्ये स्पेनचे माजी राजे जुआन कार्लोस यांचाही समावेश होता. पण जेव्हा डाली यांना त्यांच्या कामाचे पैसे देण्याची वेळ आली, तेव्हा डालीने एक विचित्र मागणी केली, त्यांना हत्ती हवा होता. साल्वादोर डाली यांच्या कलेच्या प्रेमातून त्यांना हत्तीचं पिल्लू भेट दिलं.
डालीची हत्तीची मागणी आणि शानदार स्वागत
डालीने एयर इंडियाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, “मला हत्तीला माझ्या ऑलीव्हच्या (olive) जंगलात ठेवायचं आहे आणि चंद्राच्या प्रकाशात त्याच्या पाठीवर फांद्यांच्या सावल्या कशा दिसतात, ते बघायचं आहे.”
एयर इंडियाने त्यांची मागणी मान्य केली आणि दोन वर्षांच्या हत्तीला बंगळूरुहून जिनेव्हाला विमानाने पाठवलं. तिथून ट्रकने त्याला डाली जिथे राहत होते, त्या कॅडाक्यूस नावाच्या गावी नेण्यात आलं. हत्तीच्या आगमनाचं गावात जोरदार स्वागत करण्यात आलं. गावाच्या महापौरांनी तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आणि गावात खास मिरवणूक काढण्यात आली.
हत्तीच्या स्वागताची मोठी पार्टी.
हत्तीच्या स्वागतासाठी मोठी पार्टी झाली. पार्टीत वाईन, शॅम्पेन आणि भारतीय चहा देखील पिण्यासाठी ठेवण्यात आला होता. एवढंच नाही, तर एका भारतीय ज्योतिषाला खास बोलावून घेतलं होतं, ज्याने हत्तीला आशीर्वाद दिला.
डालीच्या मनात हत्तीबद्दल खूप कल्पना होत्या. त्यांना हत्तीवरून आल्प्स पर्वत ओलांडायचा होता! पण त्यांच्या पत्नीने त्यांना हे धाडस करायला मनाई केली.
पुढे दुर्दैवाने या कथेचा शेवट चांगला झाला नाही. न्यूज18 च्या रिपोर्टनुसार, डालीला काही दिवसांनी हत्तीचा कंटाळा आला आणि त्याला बार्सिलोना येथील प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आलं.
दिल्लीतील प्रदर्शन
प्रसिद्ध चित्रकार साल्वादोर डाली हे विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या कलाकारांपैकी एक मानले जातात, त्यांची चित्रं 7 फेब्रुवारीपासून 2025 पासून नवी दिल्लीत बघायला मिळणार आहेत. ‘डाली कम्स टू इंडिया’ असं या प्रदर्शनाचं नाव आहे.
ब्रुनो आर्ट ग्रुपने हे प्रदर्शन आयोजित केलं आहे आणि क्रिस्टीन अर्जिलेट या प्रदर्शनाच्या क्युरेटर आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे प्रदर्शन पहिल्यांदा भारतात झालं होतं आणि आता दुसऱ्यांदा त्यांची चित्रं भारतात येत आहेत.
हे प्रदर्शन साल्वादोर डाली यांच्या दुर्मिळ etchings (चित्रं), watercolours (जलरंगचित्रं) आणि tapestries (वस्त्रं) सादर करेल. ही सर्व चित्रं पिअर अर्जिलेट कलेक्शनमधून घेतलेली आहेत.
या प्रदर्शनात Mythologie आणि Les Chants de Maldoror सारख्या प्रसिद्ध कलाकृती तसेच डालीच्या स्वप्नाळू, अर्धभीती आणि काल्पनिक प्रतिमा दर्शवणाऱ्या इतर अवास्तव चित्रांचाही समावेश आहे.
“The Songs of Maldoror” मालिकेत 50 चित्रं (prints) आहेत. यात आठ खास चित्रं आहेत, त्यामध्ये डालीने त्याच्या लहानपणीच्या त्रासांच्या आठवणी दाखवल्या आहेत. “Mythology” मालिकेत प्राचीन ग्रीक चिन्हे वापरून 16 चित्रं (etchings) आहेत. ही चित्रं डालीच्या “hasard objectif” नावाच्या खास पद्धतीने बनवलेली आहेत.
1960 ते 1972 दरम्यान तयार केलेली 242 खऱ्या तांब्याच्या पत्र्यावर कोरलेली चित्रं देखील प्रदर्शनात असतील. जे डालीच्या कलात्मक कौशल्याची झलक दाखवतात. हे प्रदर्शन 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे.