तुम्हाला माहित आहे का ? आपल्या देशात अनेक ठिकाणी असा चहा मिळतो जो आपल्या घरात बनवलेल्या चहापेक्षा चवीला वेगळा असतो. साधारणपणे, चहाची चव किंवा त्यात वापरण्यात येणारे मसाले हे त्या ठिकाणच्या वातावरणीय किंवा हंगामी परिस्थितीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, थंडीच्या दिवसांत आल्याचा चहा सर्वांना आवडतो. तर उन्हाळ्यात थंडाव्यासाठी पुदीनाचा चहा प्यायला जातो.
चला तर अशाच काही चहाच्या चवी बद्दल जाणून घेऊया ओळख करून घेवूयात.
काश्मिरी कहवा
हा चहा काश्मीरमध्ये बनवला जातो. त्यात केशर, वेलची, दालचिनी आणि विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आणि ड्रायफ्रूट्स टाकले जातात. काश्मिरी कहवामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि इतर अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
बटर चहा
हा चहा हिमालयीन भागात लोकप्रिय आहे. तिबेटी भाषेत पोचा या नावाने ओळखला जाणारा हा चहा हिमाचल आणि उत्तराखंडच्या दुर्गम भागात विशेषतः काही जमातींमध्ये जास्त प्रमाणात पितात. यामध्ये याक दूध, चहाची पाने , लोणी किंवा तूप आणि मीठ घालून हा चहा केला जातो. त्याची चव खारट असते
लेमन चहा
बंगालमध्ये लेमन टी खूप लोकप्रिय आहे. दुधाशिवाय बंगालच्या लेमन टीला मसाला लेमन टी असेही म्हणतात. या चहाची खासियत म्हणजे त्यात वापरलेला मसाला. लिंबू व्यतिरिक्त, त्यात जलजीरा पावडर, काळे मीठ आणि काळी मिरी हे मसाले वापरले जातात, हा चहा चवीला आंबट, गोड आणि तिखट असतो.
हाजमोला चहा
बनारसच्या अस्सी घाटावर बनवला जाणारा हाजमोला चहा ची अनोखी चव लोकांना आवडते. सुंठ, पुदिना, काळे मीठ, काळी मिरी, हजमोलाच्या गोळ्या आणि लवंगा साखरेत घालून हा मसाला तयार केला जातो. मग उकळलेल्या पाण्यात हा मसाला आणि लिंबू मिसळून चहाच्या पानांसह तो सर्व्ह केला जातो.
पेपरमिंट चहा
राजस्थानच्या नाथद्वारामध्ये मिळणारा पुदिन्याचा चहा लोकप्रिय आहे. याला “फुदीन वाली चाय” असंही म्हणतात. पुदिना आणि मसाला घालून कुल्हडमध्ये हा चहा दिला जातो.
इराणी चहा
मुंबई आणि हैदराबादमध्ये लोकप्रिय असलेला इराणी चहा तयार करण्याची खास पद्धत आहे. इराणी चहा बनवण्यासाठी पाणी आणि चहाची पाने एकत्र उकळतात. नंतर भांडे आणि त्याचे झाकण पीठाने बंद केले जाते आणि मंद आचेवर अर्धा तास उकळले जाते. तर दुस-या गॅसवर दूध उकळल्यानंतर त्यात वेलची टाकून ते अर्धे होईल इतके उकळून त्यात कंडेन्स्ड दूध घालून ते पुन्हा गरम केलं जाते. कंडेन्स्ड मिल्कऐवजी खवा किंवा मावा देखील चहामध्ये घालतात. वाफवलेल्या चहाचे झाकण उघडून त्यात साखर टाकून चहा सर्व्ह करतात.