सोमवार दिनांक 13 जानेवारीपासून प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होत आहे. जगातला सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून महाकुंभ मेळाव्याची नोंद झाली आहे. हजारो वर्षाची परंपरा असलेल्या या महाकुंभ मेळाव्याला आता आधुनिक टच सुद्धा आला आहे. भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या सोई-सुविधा, संरक्षण आणि स्वच्छतेसाठी तंत्रज्ञानात्मक साधनांचा वापर केला आहे. या सगळ्या वैशिष्ट्यांसह मेळाव्याचं एकूणच नियोजन, व्यवस्थापन पाहणं आणि आध्यात्मिकतेचा अनुभव घेणं ही एक पर्वणीच ठरणार आहे.
देश-विदेशातून अनेक भाविक आणि पर्यटकही या सोहळ्यासाठी आपली उपस्थिती लावणार आहेत. तुम्हीसुद्धा या मेळाव्यासाठी प्रयागराजला जाणार असाल तर या खास टीप्स जरुर फॉलो करा.
लवकरात लवकर तुमची ट्रीप प्लॅन करा
सोमवारपासून महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होणार आहे. हा महाकुंभ मेळावा फेब्रुवारी 26 तारखेपर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्ही आजही महाकुंभ मेळाव्याला जाण्याचा विचार करुन आपली ट्रीप फायनल करु शकता. या ट्रीपच्या प्रवासापासून प्रयागराज येथील वास्तव्यासाठी तुम्ही सरकारी आणि महाकुंभ मेळाव्यासाठी विशेषरित्या तयार केलेल्या वेबसाईटचा वापर करुन आपल्या ट्रीपचं नियोजन करु शकता.
या ठिकाणी राहण्यासाठी तुम्ही आश्रम, हॉटेल किंवा मेळावा व्यवस्थापनाकडून उभारलेल्या टेंटचा पर्याय घेऊ शकता. मात्र, यासाठी आधीच बुकिंग करुन ठेवावं लागतं हे लक्षात ठेवून ट्रीपची तिकीटं काढल्यावर लगेच राहण्याची व्यवस्था पक्की करा.
प्रवासाची साधने
देशभरातल्या प्रवाशांना या महाकुंभ मेळाव्यासाठी सोईस्कररित्या येता यावं, यासाठी भारतीय रेल्वेकडून जवळपास 13 हजार ट्रेन्सची व्यवस्था केली आहे. त्यापैकी 10 हजार ट्रेन्स या नियमीत स्वरुपातील असणार आहेत. तर 3 हजार ट्रेन्स या महाकुंभ मेळाव्यानिमित्ताने विशेष गाड्या म्हणून सोडण्यात येणार आहेत. याशिवास अयोध्या, वाराणसी, जुनापूर आणि चित्रकूट येथील भाविकांना प्रयागराजमध्ये येण्यासाठी 560 रिंग रेलची व्यवस्था केली आहे.
रेल्वेसह देशातल्या 23 शहरातून 200 चार्टर विमानाची व्यवस्था केली आहे. तसेच 7 हजार बसेसची व्यवस्था केली आहे. या 7 हजार बसेसपैकी 200 बसेस या एसी बसेस असतील.
हे ही वाचा : प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्याच्या स्वच्छतेसाठी इस्त्रो आणि BARC संस्थाही सज्ज!
शाही स्नानाचे महत्वपूर्ण सहा दिवस
जर तुम्ही आपली ट्रीप प्लॅन करत असाल तर शाही स्नान कधी असेल त्याची माहिती घेऊन त्यानुसार ट्रीपचं नियोजन करा. शाही स्नानाच्या दिवशी प्रयागराजला अलोट गर्दी असते हे लक्षात घेऊन त्यानुसार तुम्ही नियोजन करु शकता.
13 जानेवारी 2025 – पौष पोर्णिमा
14 जानेवारी 2025 – मकर संक्रांत
29 जानेवारी 2025 – मौनी अमावस्या
3 फेब्रुवारी 2025 – वसंत पंचमी
12 फेब्रुवारी 2025 – माघी पौर्णिमा
26 फेब्रुवारी 2025 – महाशिवरात्री
या सहा दिवसांपैकी सगळ्यात जास्त गर्दी ही मौनी अमावस्याच्या दिवशी असते. तर मकर संक्रांत आणि वसंत पंचमीच्या दिवशीही साधुसंतांसह अनेक भाविक पवित्र स्नान करण्यासाठी येत असतात.
बॅगपॅकमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात
थंडीचे कपडे – हिवाळ्याचा सीझन सुरू आहे. प्रयागराज इथेही नदी काठावर मोठ्या प्रमाणावर थंडी आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, शॉल, हातमोजे, पायमोजे, कानटोप्या असे कपडे जरुर घेऊन जा. तसचं या भागात वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस पडू शकतो. यासाठी शक्य असेल तर छत्री सुद्धा जवळ असू द्यात.
ओळखपत्र अत्यावश्यक – महाकुंभ मेळाव्याला जाताना आपला फोटो असणारे आयडी कार्ड न चुकता घेऊन जायचं आहे. सिक्युरिटी चेक पोस्टवर आणि कोणतीही गरज भासली तर तुमचं फोटो आयडी कार्ड तुमच्या जवळ असलेलं उत्तम. त्याशिवाय नातेवाईक, टूर लीडर, पोलिस हेल्पलाईन असे महत्त्वाचे फोन नंबर्स डायरीमध्ये लिहून ती सतत तुमच्या जवळ ठेवावी.
किंमती वस्तू नेऊ नका – या मेळाव्यात सुरक्षेची खूप काळजी घेतली आहे. ठिकठिकाणी पोलिस स्थानकांची उभारणी केली आहे. ड्रोन आणि एआय कॅमेराद्वारेसुद्धा सुरक्षा पुरवली जाणार आहे. तरिही कोणत्याही किंमती वस्तू याठिकाणी घेऊन जाऊ नका.
औषधं – तुम्ही जर कोणती औषधं घेत असाल तर ती औषधं आणि डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शनचा फोटो तुमच्याजवळ असू द्यात.
बेसिक टॉयलेटरिज – तुमचा साबण, टूथब्रश, टूथपेस्ट, पुनर्वापर करता येईल अशी पाण्याची बाटली, नॅपकिन्स अशा अत्यावश्यक गोष्टी असाव्यात.
हे ही वाचा : महाकुंभमेळ्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षा आणि सोयीसाठी नवे उपाय
सुरक्षेची काळजी
कोट्यावधी लोकं या मेळाव्यासाठी येत असतात. शाही स्नानाच्या दिवशी तर खूपच गर्दी होत असते. अशा वेळी चेंगराचेंगरी किंवा हरवण्याची शक्यता असते. त्यामुळे जिथे गर्दी असेल तिथे शक्यतो जाण्याचं टाळा. एकेकट्याने फिरू नये, तुम्ही ग्रुपने गेला असाल तर आपल्या ग्रुपसोबतच राहावं. वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांचं आणि तेथील स्थानिक स्वयंसेवकांच्या सूचनांचं पालन करावं.
प्रयागराजमधल्या संपूर्ण परिसराची माहिती भाविकांना मिळावी, संवादासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून नेव्हिगेशन मॅपसह, ‘साहाय्यक’ या विशेष गूगल चॅटबोट ॲपचा वापर करावा.
स्वच्छता राखा
जगातला सर्वात मोठा धार्मिक उत्सव अशी नोंद झालेल्या या महाकुंभ मेळाव्याच्या परिसरात अस्वच्छता आणि घाणीचं साम्राज्य होऊ नये म्हणून यात्रेकरु म्हणून आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक सेक्टरमध्ये असलेल्या स्वच्छतागृहाचा योग्य पद्धतीने वापर करावा, उघड्यावरील अन्न खाऊ नये, व्यवस्थापन कमिटीकडून मंजूर केलेल्या अधिकृत स्टॉलवरुनच अन्नपदार्थ खरेदी करावेत, प्रत्येक सेक्टरमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तिथूनचं पाणी घ्यावं, शक्य असेल तर मास्क वापरावा.
धार्मिक उत्सवाचा आदर राखा
महाकुंभ मेळाव्याला जाताना तुम्ही धार्मिक उत्सवामध्ये सहभागी व्हायला जात आहात याची जाणीव ठेवून त्यानुसार आपलं वर्तन ठेवावं. आपण परिधान करणार असलेले कपडे हे नीटनेटके असावेत. अंगप्रदर्शन होईल असे कपडे नसावेत. ज्याठिकाणी फोटो काढण्यास मनाई आहे, त्याठिकाणी फोटो काढू नयेत. धार्मिक विधी, प्रार्थना आणि शांततेविषयीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं.